Advertisement

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, महिला प्रवाशांना मिळणार 'हा' दिलासा

पश्चिम रेल्वे ६ विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात २ लोकल ट्रेन या खास महिला प्रवाशांसाठी चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, महिला प्रवाशांना मिळणार 'हा' दिलासा
SHARES

मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ६ विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात २ लोकल ट्रेन या खास महिला प्रवाशांसाठी चालवण्यात येणार आहे. यामुळे नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लाॅकडाऊन आता बऱ्यापैकी शिथील केलं आहे. उद्योगधंदे, कार्यालये हळुहळू सुरू होत असून कर्मचाऱ्यांची ये-जा देखील वाढलेली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मर्यादीत प्रमाणात लोकल ट्रेन सेवा चालवण्यात येत होती. परंतु त्यात राज्य सरकारच्या परवानगीने इतर काही महत्त्वाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील प्रवासास मुभा देण्यात आली आहे. 

यामुळे लोकल ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू नसली, तरी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु वाढत्या गर्दीमुळे या नियमाला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचं ठरवलं. यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार ६८ लोकल सेवेची वाढ करण्यात आली आहे. आधी मध्य रेल्वे मार्गावर ३५५ उपनगरीय सेवा चालविल्या जात होत्या, यामध्ये ६८ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावर दररोज एकूण ४२३ लोकल फेऱ्या चालविल्या जात आहेत.

हेही वाचा - Central Railway: प्रवाशांच्या सेवेसाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

तर, पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ३५० विशेष लोकल चालवल्या जात होत्या, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं विशेष लोकलची संख्या १५० ने वाढवून ५०० केली आहे.

ज्या ६ अतिरिक्त विशेष लोकलची घोषणा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे. त्यात २ महिला विशेष लोकल सेवेचाही समावेश आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान ही अत्यावश्यक महिला विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. सोमवार २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर पाळण्यात यावं व लोकलमध्ये गर्दी होऊ नये या होऊ नये या हेतूने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा