पुढच्या वर्षभरात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील अशी अत्यंत मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी केली आहे. लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी टोल संदर्भातील प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं.
टोलनाके हटवण्याच्या मुद्द्यावरून नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षरित्या यूपीए सरकारला देखील लक्ष्य केलं. ते म्हणाले, टोलनाक्याच्या माध्यमातून मलई खाण्यासाठीच देशभरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर टोलनाके उभारण्यात आले आहेत. या व्यवस्थेला उखडून टाकण्यासाठी मी सभागृहाला सांगू इच्छितो की पुढील एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अंमलजबावणी केली जाईल. टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करणे हा नाही, तर केवळ टोलनाके हटवणं असा आहे.
हेही वाचा- रिक्षा-टॅक्सीच्या मीटर बदल प्रक्रियेसाठी मोबाइल अॅप
त्यानुसार जीपीएसमधून काढण्यात येणाऱ्या फोटोंच्या माध्यमातून टोल वसुली केली जाईल.परिणामी तंत्रज्ञानाच्या मदतीनं जेवढं त्यांचं वाहन रस्त्यांवर चालेल, टोल तेवढाच द्यावा लागेल. आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर रस्ता तयार करणारी कंपनी त्याची ताबडतोब भरपाई मागेल, परंतु सरकारनं येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
एवढंच नाही, तर फास्टटॅगच्या माध्यमातून टोल न भरणाऱ्या वाहनांची पोलीस चौकशी करण्याचा आदेश देखील मी दिला आहे. वाहनांना फास्टटॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरीची केस दाखल होईल. फास्टटॅगच्या माध्यमातून टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पेमेंटला चालना देण्यात आली आहे. ही यंत्रणा २०१६ मध्ये आणण्यात आली होती. १६ फेब्रुवारीपासून फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे फास्टटॅग नसल्यास वाहनांना दुप्पट टोल भरावा लागत आहे.
(within next year all toll plaza will remove from highway says central cabinet minister nitin gadkari)
हेही वाचा- 'या' रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सेवेत सुविधांयुक्त प्रतीक्षालयं