'पद्मावती' प्रदर्शित होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही - दीपिका पादुकोण


SHARE

'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाला देशभरात विरोध होत आहे. काही राजपूत संघटनांनी 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी राजपूत संघटनांनी दिली आहे. नुकताच 'पद्मावती' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी हा विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला. 'पद्मावती' चित्रपटात विरोध करण्यासारखं काहीच नाही, असंही भन्साळींनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं. पण तरीही 'पद्मावती' चित्रपटाचं प्रदर्शन अधांतरीच आहे.

'पद्मावती' चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पण 'पद्मावती' चित्रपटाला होणारा विरोध पाहता चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होतो की नाही? यावर शंका व्यक्त करण्यात येत होती. पण आता पद्मावती चित्रपटातील राणी म्हणजेच दीपिका पादुकोण आता मैदानात उतरली आहे. "पद्मावती चित्रपट प्रदर्शित होणे गरजेचं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही," असं ठाम मत तिनं व्यक्त केलं आहे.

दीपिका म्हणाली की, "आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधील आहोत. पद्मावती राणीची कथा ही सर्वांसमोर यायला हवी. अशा चित्रपटाला विरोध होत असेल, तर हे खरंच दुर्दैवी आहे. आपण सगळे पुढे जाण्याऐवजी मागे जातोय. आम्ही केवळ सेन्सॉर बोर्डाला उत्तर देण्यास बांधील आहोत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही," अशा शब्दांत दीपिकानं टीकाकारांना ऐकवलं आहे.

'पद्मावती' विरोधात आता राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना टक्कर देण्यासाठी आता बॉलिवूड देखील एकवटले आहे. सोमवारी बॉलिवूडच्या पाच संघटनांनी एकत्र येत 'पद्मावती'ला पाठिंबा दिला. या पाचही संघटना येत्या १६ नोव्हेंबरला १५ मिनिटांसाठी शूटिंग थांबवून आपला विरोध दर्शवणार आहेत.हेही वाचा

पद्मावतीने वाढवल्या दीपिकाच्या अडचणी


संबंधित विषय