Advertisement

बॉलिवूडमधली 'घराणेशाही'


बॉलिवूडमधली 'घराणेशाही'
SHARES

बॉलीवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याला वाचा फोडली ती कंगना रणौतनेच. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिनं करणला घराणेशाहीचा झेंडा मिरवणारा म्हणत एका नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पण कंगनाचं स्पष्ट आणि बिनधास्त बोलणं मात्र काहींना नक्कीच झोंबलं. खास करून घराणेशाहीचा वारसा चालवणाऱ्यांना तर आणखीनच टोचलं.

नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात तर या वादाचा कहरच झाला. सैफ अली खान, करण जोहर आणि वरूण धवन यांनी आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान 'नेपोटिझम रॉक्स' म्हणत कंगणावर निशाणा साधला. पण सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी तिघांचा चांगलाच समाचार घेतला. आपल्या वक्तव्याला होणारा विरोध पाहता करण जोहर, सैफ अली खान आणि वरूण धवनने माफी मागितली.

पण कंगना रणौतने केलेले वक्तव्य काही चुकिचे नव्हते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळणे तसे पाहिले तर खूप कठिण असते. एका ब्रेकसाठी इंडस्ट्रीत येणाऱ्या तरूण-तरूणींना प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. पण बॉलिवूड स्टारच्या किड्सना पहिला ब्रेक सहज मिळतो. आई किंवा वडिलांच्या नावाचा फायदा घेत या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं. अशाच काही स्टार्सची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.


रणबीर कपूर

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंब तसं नावाजलेलं. रणबीर कपूर हा ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा मुलगा आहे. रणबीर कपूरनं 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरीया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटात त्याने केलेला अभिनय कौतुकास्पद ठरला. 'सावरीया' चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

2009 साली 'वेक अप सिड' आणि 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटांसाठी समीक्षकांचा सर्वोत्तम पुरस्कार मिळाला. 'रॉकस्टार' (2011) आणि 'बर्फी' (2012) या चित्रपटांमध्ये रणबीरनं आपल्या अभिनयाची खरी जादू दाखवली. या चित्रपटांसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. एका नावाजलेल्या कुटुंबातून रणबीरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी आज इंडस्ट्रीत त्याची स्वत:ची ओळख आहे.


हृतिक रोशन

हृतिक रोशन बॉलिवूड कलाकार आणि निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आहे. हृतिकने 2000 साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. राकेश रोशन या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक होते. 

फिजा, यादे, कोई मिल गया, लक्ष, क्रिश, जोधा अकबर आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा, काबील अशा अनेक चित्रपटांमध्ये हृतिकने काम केले आहे. हृतिकला सहा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.


शाहीद कपूर

शाहीद कपूर पंकज कपूर यांचा मुलगा आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर शामक दावर यांच्याकडून शाहीदने नृत्याचे धडे गिरवले आहेत. म्युझिक व्हीडिओ आणि जाहिरातीमधून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. सुभाष घाई यांच्या 'ताल'(1999) या चित्रपटात तो बॅक डांसर म्हणून झळकला होता. चार वर्षांनंतर शाहीदनं 'इष्क विष्क' (2003) चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. 

2007 साली प्रदर्शित झालेली 'जब वी मिट'मुळे शाहीदला खऱ्या अर्थाने प्रसिद्दी मिळाली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार देण्यात आला. 'उडता पंजाब' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचंही सर्वांनी कौतुक केले.


आलीया भट्ट

आलीया भट्ट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. 1999 मध्ये 'संघर्ष' या चित्रपटात आलीयानं बाल कलाकाराची छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर आलियानं 2012 साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' चित्रपटातून अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

टू स्टेट, शानदार, हायवे, उडता पंजाब या चित्रपटांमध्ये आलीयाने उल्लेखनीय काम केले आहे. 'उडता पंजाब'साठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.


करीना कपूर

करीना कपूर रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आहे. 2000 साली 'रेफ्युजी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिने सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पटकावला. 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील तिची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली. 

2004 साली 'चमेली' चित्रपटात तिने साकारलेली भूमिका तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणारी ठरली. त्यानंतर 'ओमकारा' आणि 'जब वी मेट' या दोन चित्रपटात तिने वेगळ्या भूमिका साकारल्या. 'जब वी मेट'साठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला.

वरूण धवन

वरूण धवन हा बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हीड धवन यांचा मुलगा आहे. वरूणने 2012 साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 

त्यानंतर बद्रीनाथ की दुल्हनिया, बदलापूर, अबकड 2 अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांवर आपली छाप सोडली.


नावाजलेल्या आणि प्रसिद्ध कुटुंबातून या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीत अपयशाचा सामना करावा लगला. सध्याच्या घडीला हे स्टार किड्स बॉलिवूडमधून छुमंतर झाले आहेत.


फरदिन खान

फरदिन खान हा फिरोज खान यांचा मुलगा आहे. 1998 साली 'प्रेम अगन' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

त्यानंतर जंगल, ओम जय जगदिश, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या फरदिन चित्रपट इंटस्ट्रीपासून चार हात लांबच आहे.


तुषार कपूर

तुषार कपूर जितेंद्र आणि शोभा कपूर यांचा मुलगा आहे आणि एकता कपूरचा भाऊ आहे. 2001 साली आलेल्या 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून तुषारनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

त्यानंतर अनेक चित्रपटात तुषारनं काम केलं. पण प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडण्यात तुषार अपयशी ठरला.


इशा देओल

इशा देओल धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. 2002 साली आलेल्या 'कोई मेरे दिल से पुछे' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. पण चित्रपट बॉक्स ऑफिसलर चालला नाही. 

त्यानंतर अनेक चित्रपटात तिने काम केले. पण इशा हेमा मालिनी यांच्यासारखी यशस्वी होऊ शकली नाही.


जॅकी भगनानी

जॅकी भगनानी हा निर्माता वासु भगनानी यांचा मुलगा आहे. २൦൦९ साली त्यांनी 'कल किसने देखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २൦११ मध्ये 'फालतू' या चित्रपटात जॅकीनं महत्त्वाची भूमिका पार पाडली. 

त्यानंतर २൦१२ मध्ये 'अजब गजब लव' आणि २൦१४ मध्ये 'यंगिस्थान' चित्रपटात काम केले आहे. पण हे चित्रपटही बॉलिवूडमध्ये त्याची नय्या पार लावू शकले नाहीत.


तनीषा मुखर्जी

तनीषा मुखर्जी निर्माता-दिग्दर्शक शोमू मुखर्जी आणि तनुजा यांची मुलगी आहे. २००३ साली 'शु...' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

त्यानंतर २००८ मध्ये 'सरकार' या चित्रपटात तिनं छोटी भूमिका साकारली आहे. काही दाक्षिणात्य चित्रपटातही तिनं काम केलं आहे. २०१३ साली 'बिग बॉस ७'मध्ये ती सहभागी झाली होती. पण सध्या ती चित्रपट इंडस्ट्रीतून गायब झाली आहे. 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा