बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

 Mumbai
बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

सीएसटी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 ला रात्री आठ वाजता नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवीन नियम केले असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात 28 फेब्रुवारीला बँकेतील कर्मचारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारणार आहेत. त्यात खाजगी बँक, विदेशी आणि राष्ट्रीयीकृत बँक यामधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण अंदाजे 10 लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँकचे उपसचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली.

सामान्य नागरिकांच्या ठेवींवरील व्याजदर कमी केलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठ नागरिक जे व्याजावर स्वतःचे कुटुंब चालवत होते त्यांना आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर किती पैसा जमा झाला? काळे धन किती जमा झाले? याची माहिती दिलेली नाही. ज्या बँका डबघाईला होत्या त्या नोटाबंदीनंतर अजून डबघाईला आल्या आहेत. ग्रामीण ठिकाणी अजूनही एटीएममध्ये पैसे भरलेले नाहीत. तसेच नवीन 2 हजार आणि 500 च्या नकली नोटा तपासायच्या मशीनही अद्याप बँकेल्या मिळालेल्या नसल्याचं तुळजापूरकर यांनी सांगितले.

नोटबंदीमध्ये ज्यांनी गैरव्यवहार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच रिझर्व्ह बँकेने जे मोठया प्रमाणात कर्ज घेतात आणि भरत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसा नियम बनवावा, अशी मागणी तुळजापूरकर यांनी यावेळी केली. येत्या 17 फेब्रुवारी रोजी फोर्ट परिसरात रिझर्व्ह बँकेसमोरील ओ.बी.सी बँकेच्या गेटजवळ सायंकाळी 5 वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading Comments