कॅशलेस व्यवहारांत सतर्कताही हवी

मुंबई - डिमॉनिटायझेशन नंतर बाजारात नोटांची चांगलीच चणचण भासू लागलीय. त्यामुळं व्यवहार कॅशलेस करण्यावरही सरकार भऱ देतंय. मात्र या ई ट्रॅन्झक्शनला आपला देश तयार आहे का, असा प्रश्न आम्ही सायबर एक्सपर्टला विचारला तर त्याचं उत्तर त्यांनी नाही असं दिलंय. एवढंच नाही तर सायबर गुन्हांच्या निकालाची स्थिती ऐकलीत तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

कॅशलेस व्यवहारांवर जास्त भर दिला तर सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे, असा दावा सायबर एक्स्पर्ट विजय मुखी यांनी केलाय. दरम्यान या बाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय. पोलिसांच्या सायबर सेलचे डीसीपी सचिन पाटील म्हणतात की, अनेकांना बँकेतून बोलतोय असं भासवून एटीएम पिन मागणारे फोन येतात. आम्ही असे फोन करत नाही, असं बँकांकडून वारंवार सांगितलं जातं. तरीही काही जण या किंवा अन्य प्रकारच्या जाळ्यात अडकून फसतात. त्यामुळे अशी कुठलीही माहिती विचारणारा फोन आला, तरी काहीच माहिती द्यायची नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं.

एकूणच काय, वाढणारे सायबर गुन्हे रोखायचे असतील तर पोलिसांसोबत आपणही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

Loading Comments