Advertisement

जागतिक नाणेनिधीने घटवला भारताचा विकास दराचा अंदाज

जागतिक नाणेनिधीच्या जाहीर झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक अपडेट’ मध्ये एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या १२.५ टक्के आणि जानेवारीतील ११ टक्के अंदाजात कपात केली आहे.

जागतिक नाणेनिधीने घटवला भारताचा विकास दराचा अंदाज
SHARES

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यंदा भारताच्या विकास दराचा घटवला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत डेल्टाचा नवा विषाणू समोर आल्यामुळे जागतिक नाणेनिधीने भारताचा विकास दर कमी राहणार असल्याचं म्हटलं आहे. आयएमएफने आधीच्या अंदाजात तीन टक्के कपात केली आहे. 

जागतिक नाणेनिधीच्या जाहीर झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक अपडेट’ मध्ये एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या १२.५ टक्के आणि जानेवारीतील ११ टक्के अंदाजात कपात केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा विकास दर म्हणजेच जीडीपी ९.५ टक्के राहील असं आयएमएफने म्हटलं आहे. 

कोरोनाची दुसरी लाट मार्च ते मे दरम्यान आल्यानंतर अर्थव्यवस्था सावरण्याच्या अपेक्षेला झटका बसला. त्यामुळे भारताच्या विकास दरात कपात करावी लागत आहे, असं आयएमएफने म्हटलं आहे.

नाणेनिधीने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी भारतासारख्या देशाला लसीकरणाला वेग देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.  लसीकरणात भारत मागे पडला आहे. कोरोनाचे आणखी विषाणूमुळे रुग्णसंख्या वाढली तर त्याचा मोठा फटका भारताला बसू शकतो, असंही नाणेनिधीने म्हटलं आहे.

आयएमएफने म्हटलं की, भारताच्या जीडीपी अंदाजात कपात केली असली तरी भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनचा जीडीपी ८.१ टक्के राहण्याचा अंदाज एप्रिलमध्ये व्यक्त करण्यात आला असून त्यात ०.३ टक्के घसरण होऊ शकते. पुढील वर्षी भारताचा जीडीपी ८.५ टक्के वाढू शकतो.

नाणेनिधीने जागतिक जीडीपी यंदा ६ टक्के आणि पुढील वर्षी ४.९ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून हे अंदाज यापूर्वीच एप्रिलमध्ये जाहीर केले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा