Advertisement

'सीसीडी'वर प्राप्तिकर विभागाचे छापे


'सीसीडी'वर प्राप्तिकर विभागाचे छापे
SHARES

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कॅफे काॅफी डे (सीसीडी) या लोकप्रिय काॅफी सेंटरच्या चेनवर टाकलेल्या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाला उत्पन्नाच्या तुलनेत ६५० कोटी रुपये अधिक आढळून आले आहेत. गुरूवार २१ सप्टेंबर ते रविवार २४ सप्टेंबर रात्री उशीरापर्यंत प्राप्तिकर विभागाचे धाडसत्र सुरू होते. त्यात कर्नाटक, मुंबई आणि चेन्नईतील डझनभर कॅफे काॅफी डे काॅफी सेंटर आणि या चेनशी संलग्न कंपन्यांच्या २० ठिकाणांवर जी कागदपत्रे सापडली, त्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.


काय म्हणाले प्राप्तिकर अधिकारी?

यासंर्भात प्राप्तिकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ६५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट होत आहे. ही रक्कम अधिक असण्याची शक्यता आहे.


प्राप्तिकर नियमांचे उल्लंघन

प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार छाप्यात प्राप्तिकर नियमांच्या उल्लंघनाचे अनेक पुरावे मिळाले आहेत. प्राप्तिकर विभागाचे इन्व्हेस्टिगेशन सेलचे संचालक बी. आर. बालकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली हे छापे टाकण्यात आले.

सीसीडीचे संस्थापक मालक व्ही. जी. सिद्धार्थ आणि अन्य अधिकाऱ्यांच्या कर्नाटक, बंगळुरू, चिकमंगळुरू, हासन आणि मैसूर येथील ठिकाणांवर सलग ४ दिवस छापे टाकण्यात आले. अमालागामेटेड बीन काॅफी ट्रेडिंग कंपनी लि. द्वारे सीसीडी काॅफी सेंटर्स चालविण्यात येतात.

सीसीडीचे प्रवर्तक आणि मालक व्ही. जी. सिद्धार्थ हे माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आहेत. काही दिवसांपूर्वीच कृष्णा यांनी भाजपात प्रवेश घेतला होता.


छाप्यांचा सीसीडीवर परिणाम काय?

शेअर बाजाराला सोमवारी सकाळी सुरूवात होताच सीसीडीचे शेअर्स ९.८६ टक्क्यांनी घसरले, यापूर्वी सीसीडीचे शेअर्स २०८.९५ रुपयांवर होते. सीसीडीने २०१७ च्या पहिल्या तिमाहीत ५१.१५ टक्क्यांची वाढ नोंदवत २६.८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मुंबईत सीसीडीचे ३३ काॅफी सेंटर्स असून या छाप्यांनी सीसीडीची प्रतिमा डागाळली असली, तरी शहरात दमदार प्रतिस्पर्धी नसल्याने व्यवसायावर कुठलाही परिणाम होणार नाही, असेच दिसत आहे.



हेही वाचा -

येस बँकेने २,५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा