१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या

बँकांनी जेटला तारण्यासाठी बेलआऊट पॅकेज देण्याची तयारी दाखवलेली असताना या विमान कंपनीसमोरील अडचणी दूर होतील, असं म्हटलं जात होतं. परंतु जेटच्या १ हजार वैमानिकांनी ३१ मार्चपर्यंत थकीत वेतन न दिल्यास संपावर जाण्याचा इशारा दिल्याने कंपनीच्या चिंतेत भर पडली आहे.

SHARE

जेट एअरवेजचे संस्थापक संचालक नरेश गोयल यांनी जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्यानंतर तसंच बँकांनी जेटला तारण्यासाठी बेलआऊट पॅकेज देण्याची तयारी दाखवलेली असताना या विमान कंपनीसमोरील अडचणी दूर होतील, असं म्हटलं जात होतं. परंतु जेटच्या १ हजार वैमानिकांनी ३१ मार्चपर्यंत थकीत वेतन न दिल्यास संपावर जाण्याचा इशारा दिल्याने कंपनीच्या चिंतेत भर पडली आहे.


बेलआऊट पॅकेज

जेट एअरवेज आर्थिक गाळात गेल्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक आॅफ इंडियाने जेटला बेलआऊट पॅकेज देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार जेटला १५०० कोटी रुपये मिळाले आहेत. तसंच गोयल यांच्या राजीनाम्यानंतर कर्ज वसुलीसाठी बँकां गोयल यांची कंपनीतील हिस्सेदारी विकण्याची तयारी सुरू केली आहे. ९ एप्रिलपासून समभाग विकण्यासाठी बोली लावण्यात येईल. ३० एप्रिलपर्यंत हा लिलाव सुरू राहील.


कंपन्या इच्छुक

त्यानुसार जूनपर्यंत जेटला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप, एअर एशिया, स्पाईस जेटने जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शवली आहे. लिलाव सुरू होताच परदेशी कंपन्यादेखील या लिलावात सहभाग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


आक्रमक भूमिका

त्यातच वेतनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जेटच्या वैमानिकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. ३१ मार्चपर्यंत थकित वेतन न दिल्यास, तसंच पुनर्जीवन योजनेची स्थिती स्पष्ट न झाल्यास १ एप्रिलपासून एकही विमान उडणार नाही, अशी घोषणा जेट एअरवेजच्या सुमारे ११०० वैमानिकांचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संस्थेने केली आहे. त्यामुळे रविवारपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास जेटपुढील अडचणी वाढणार आहेत.हेही वाचा-

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांचा राजीनामा

पीएनबी, एसबीआय जेट एअरवेजला तारणार, देणार आपत्कालीन कर्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या