SHARE

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात ५०० आणि २ हजार रुपयांच्या नवीन नोटा आल्या. या नोटांसोबत सुट्या पैशांची चणचण सोडविण्यासाठी १० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटाही बाजारात आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानुसार लवकरच ५० रुपयांची नवी कोरी नोट बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५० रुपयांच्या नव्या नोटेचे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.


सेफ्टी फिचर्स

प्रत्यक्षात ही नोट कशी असेल, याबद्दल उत्सुकता असताना फोटोत दिसणारी ५० रुपयांची नोट फिकट निळ्या रंगाची असून नोटेच्या मधोमध राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा दिसत आहे. नोटेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीत रिझर्व्ह बँक असे लिहिलेले आहे. या नोटेतही चढत्या क्रमाने सिरियल क्रमांक छापल्याचे दिसत असून नोटेवर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. या नोटेतही २ हजार रुपयांच्या नोटेप्रमाणे सर्व सेफ्टी फिचर्स असल्याचे म्हटले जात आहे.


१० ची नोट गुलदस्त्यात

काही दिवसांपूर्वी आरबीआयने नव्या नोटा छापण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले होते. ५० रुपयांच्या नोटेचे दर्शन फोटोतून होत असले, तरी १० रुपयांची नोट कशी असेल, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. ५० ची नवी नोट आल्यानंतर जुनी ५० रुपयांची नोट बाद होणार नाही, असेही म्हटले जात आहे.

काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करून २ हजार रुपयांच्या नोटा तात्काळ बाजारात आणण्यात आल्या. मात्र या नोटांमुळे सुट्या पैशांची मोठी चणचण निर्माण झाली. ५०० रुपयांच्या नोटा बाजारात येण्यास बराच उशीर झाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले. त्यानंतर परिस्थिती हळुहळू आटोक्यात आली.हे देखील वाचा -

‘सिक्कां’च्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांना ३१ हजार कोटींचा फटकाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या