Advertisement

‘सिक्कां’च्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांना ३१ हजार कोटींचा फटका


‘सिक्कां’च्या राजीनाम्याने गुंतवणूकदारांना ३१ हजार कोटींचा फटका
SHARES

देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘इन्फोसिस’चे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का (५०) यांच्या राजीनाम्याने सलग तीन दिवसांपासून तेजी नोंदवत असलेले देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी संध्याकाळी घसरण नोंदवून बंद झाले. तर दिवसभरात कंपनीचे शेअर्स तब्बल १३.३९ टक्क्यांनी घसरले. सिक्का यांच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे ३१ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी सकाळी विशाल सिक्का यांनी राजीनाम्याची घोषणा करताच ‘इन्फोसिस’चे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले. तर मुंबई शेअर बाजारात तब्बल ४०० अंकांची जबरदस्त घसरण नोंदवण्यात आली. पण दिवसअखेर या घसरणीवर ताबा मिळवण्यात यश आल्याने मुंबई शेअर बाजार २७० अंकांच्या घसरणीनंतर ३१,५२६ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६७ अंकांनी घसरून ९८३७ वर बंद झाला. या घसरणीमुळे कंपनीचे स्टॉक्स १ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर आले. मात्र या चढ-उताराचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून एका दिवसात गुंतवणूकदारांचे ३१, ४१८ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.


संचालक मंडळ नाराज

विशाल सिक्का गेल्या तीन वर्षांपासून या पदावर कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करतानाच कंपनीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सिक्का यांचा राजीनामा दु:खद असल्याचे म्हणत संचालक मंडळाने नारायण मूर्ती यांच्यावर नाराजी दर्शवली. मूर्ती यांनी सिक्का यांच्यावर वैयक्तिक आरोप केल्यानेच ते आपल्या पदावरून पायउतार झाल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे.


काय म्हणाले सिक्का?

मागच्या तीन वर्षांत आम्ही नेहमीच इनोव्हेशनवर भर दिला. मार्जिनला स्थिर ठेवण्यावर भर दिला. आम्ही जे केले ते यापूर्वी कुणीही केले नव्हते. २०१४ नंतर २००० कोटी रुपयांचा लाभांश दिला. ३ वर्षांत ५ हजार जणांना नोकऱ्या दिल्या. २५ नवीन सेवा सुरू केल्या. यामुळे तीन वर्षांच्या माझ्या कामगिरीचा मला गर्व आहे.


नारायण मूर्तींचे १ हजार कोटी घटले

इन्फोसिसचे संस्थापक आणि माजी चेअरमन नारायण मूर्तींना देखील सिक्का यांच्या निर्णयाचा फटका बसलेला आहे. मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे कंपनीचे ७,९०,०२,१०४ शेअर्स (३.४४ टक्के) आहेत. यांत स्वत: मूर्ती यांच्याकडे ०.३८ टक्के, पत्नी सुधा मूर्ती ०.७९, मुलगी अक्षता मूर्ती ०.८९, आणि मुलगा रोहन मूर्ती १.३८ टक्के शेअर्स आहेत. या शेअर्सचे बाजारमूल्य ८०६८ कोटी रुपये इतके आहे. शुक्रवारच्या फटक्यानंतर हे बाजारमूल्य १०६८ कोटी रुपयांनी घटल्याचे म्हटले जात आहे.



हे देखील वाचा -

एकेकाळचे कोट्यधीश झाले बेघर, रेमंडचे विजयपत सिंघानियांची करूण अवस्था



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा