Advertisement

पीएमसी बँक प्रकरणातून घ्या 'हा' धडा, अशी करा आपली गुंतवणूक

पीएमसी बँक प्रकरण हे आपणा सर्वांसाठी एक धडाच आहे. बँकेवरील कारवाईची बातमी एेकल्यानंतर एका खातेधारकाला अॅटॅक आला. आपली आयुष्याची जमापुंजी धोक्यात आली असेल तर कुणाचीही अशीच अवस्था होईल. मात्र, ही वेळ न येऊ देण्यासाठी सर्वांनी आताच सावध व्हायला हवं.

पीएमसी बँक प्रकरणातून घ्या 'हा' धडा, अशी करा आपली गुंतवणूक
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी विविध निर्बंध घातले आहेत. बँकेच्या खातेधारकांना अवघे १ हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे खातेधारकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. बँकेतून पैसे मिळत नसल्याने आता खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. काही खातेधारकांचे बँकेत लाखो रुपये आहेत. आपली आयुष्याची जमापुंजी पीएमसीमध्ये ठेवलेले अनेक खातेदार आहेत. हे सर्व खातेदार आता धास्तावले आहेत. एेन अडचणीच्या वेळेला आपले हक्काचे पैसेच मिळणार नसतील तर त्या पैशाचा काय उपयोग असं म्हणत खातेदार त्रस्त झाले आहेत.

सर्व अंडी एकाच टोकरीत ठेवू नका, असा सल्ला नेहमीच गुंतवणुकदारांना दिला जातो. याचा अर्थ म्हणजे, त्या टोकरीला काही धोका झाल्यास सर्वच अंडी फुटतील. जर ही अंडी विभागून अनेक टोकऱ्यांमध्ये ठेवली आणि एक टोकरी धोक्यात आली तरी इतर टोकरीतील अंडी वाचतील. गुंतवणुकीचंही असंच आहे. जर तुमची गुंतवणूक एकाच ठिकाणी असेल तर तुमची सर्व गुंतवणूक धोक्यात येऊ शकते. ही गुंतवणूक जर वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर ती बुडण्याचा धोका कमी होतो. जर एका ठिकाणची गुंतवणूक धोक्यात आली तर दुसऱ्या ठिकाणची गुंतवणूक अशा वेळी कामाला येते. खरंतर पीएमसी बँक प्रकरण हे आपणा सर्वांसाठी एक धडाच आहे. बँकेवरील कारवाईची बातमी एेकल्यानंतर एका खातेधारकाला अॅटॅक आला. आपली आयुष्याची जमापुंजी धोक्यात आली असेल तर कुणाचीही अशीच अवस्था होईल. मात्र, ही वेळ न येऊ देण्यासाठी सर्वांनी आताच सावध व्हायला हवं.

बऱ्याच जणांचं एकाच बँकेत खातं असतं. आपण आपली मेहनतीचं कमाई एकाच बँकेत ठेवून मोठा धोका पत्करत आहोत, हाच धडा पीएमसी प्रकरणावरून सर्व खातेधारकांनी घ्यायला हवा. अन्य बँकांच्या तुलनेत सहकारी बँका अधिक व्याज देत असल्याने अनेक लोक सहकारी बँकांमध्ये खातं उघडतात. या बँकांमध्ये इतर बँकांच्या तुलनेत खातं उघडण्याच्या अटीही फारशा कडक नसतात. सहजपणे खातं उघडलं जातं. त्यामुळे लोकही या सहकारी बँकांना प्राधान्य देतात. मात्र, गुंतवणूकदारांनी दोन ते तीन बँकांमध्ये खातं उघडून पैसे ठेवायला हवेत. या बँकांमध्ये सरकारी बँका, खासगी बँक आणि सहकारी बँकेचा समावेश असावा. या दोन ते तीन बँकांमध्ये पैसे विभागून ठेवल्यास पैसे बुडण्याचा धोका कमी होऊन आपण चिंतामुक्त राहू. सहकारी बँकांमध्ये अधिक व्याज मिळत असेल किंवा सहजपणे खातं उघडलं जात असलं तरी या बँकांमध्ये सर्वच पैसे ठेवणं धोकादायक असेल. आपल्या जवळील पैशापैकी १० टक्केच पैसे सहकारी बँकांमध्ये ठेवणं संयुक्तिक असेल. बाकी पैसे मोठ्या खासगी बँका आणि सरकारी बँकांमध्ये ठेवावेत. गुंतवणूक अशी विभागली गेल्यास धोकाही विभागला जाईल.

अनेक सहकारी बँकांची अवस्था जेमतेमच आहे. त्यांचं कामकाज कमजोर असल्याचंही दिसून येतं. अनेक सहकारी बँका राजकीय नेत्यांच्या हातामध्ये आहेत. बऱ्याच बँकांच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) हे याचं ताजं उदाहरण आहे. शिखर बँकेतील घोटाळाप्रकरणी ईडीने ७० संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील सहकारी बँकांची प्रमुख असलेल्या शिखर बँकेच्या व्यवस्थापनावरच आता प्रश्नचिन्ह उमटलं आहे. पण या दोन बँकांच्या कामकाजावरून सर्वच सहकारी बँकांच्या कामकाजाबाबत शंका घेणं चुकीचं ठरेल. अनेक बँका सुस्थितीत आहेत आणि नियमाप्रमाणे काम करत आहेत. मात्र, गुंतवणुकदारांनी पीएमसी बँकेवरून नक्कीच बोध घ्यायला हवा.



हेही वाचा  -

'ह्या' कारणामुळे पीएमसीवर आले निर्बंध

PMC बँकेतून EMI भराल कसा? हे वाचून मिळू शकेल उत्तर...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा