Advertisement

हायपरलूपने मुंबई ते पुणे अंतर अवघं २० मिनिटांचं, राज्य सरकारसोबत करार


हायपरलूपने मुंबई ते पुणे अंतर अवघं २० मिनिटांचं, राज्य सरकारसोबत करार
SHARES

मुंबईहून पुणे गाठण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्गाने किमान ३ तास लागतातच. जवळपास १५० किलोमीटरचं हे अंतर भविष्यात फक्त २० मिनिटांत कापता येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत राज्य सरकारने पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (आशय पत्र) वर स्वाक्षरी केली आहे.


ताशी वेग १ हजार किमी

त्यानुसार पहिला हायपरलूप मार्ग मध्य पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या कामाचं नुकतच भूमीपूजन करण्यात आलं आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग १ हजार किमी असेल, अशी माहिती व्हर्जिन हायपरलूपचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत दिली.


प्रकल्पाचं मूल्यांकन

या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप वन (व्हीएचओ) सोबत राज्य सरकारने करार केला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि व्हर्जिन हायपरलूपमध्ये ३ महिन्यांपूर्वी एक करार झाला होता. या करारानुसार हा प्रकल्प व्यवहार्य आहे का? आणि असेल तर हा प्रकल्प कशाप्रकारे प्रत्यक्षात आणता येईल? याचा अभ्यास करत यासंबंधीचा सविस्तर अहवाल ६ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवाल नुकताच सादर केला होता.


काय आहे हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन?

  • प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. उद्योजग रिचर्ड ब्रॅन्सन यांनी कॅलिफोर्नियात व्हर्जिन हायपरलूप कंपनीची स्थापना केली.
  • यानुसार दोन शहरांना जोडणाऱ्या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. (एक मुंबईकडे जाणारी, तर पुण्याच्या दिशेने) ट्रेनप्रमाणे स्पेशल कम्पार्टमेंट एका दिशेने दुसरीकडे प्रवास करतात. ठराविक अंतराने असलेल्या मॅग्नेटिक अॅक्सलेरेटर्समुळे हे कम्पार्टमेंट पुढे सरकतात. कम्पार्टमेंट भोवती हवेचा कमी दाब तयार करुन वेग वाढवला जातो.
  • प्रवाशांची वाहतूक करताना त्यांचा वेग ताशी १ हजार किमी असेल, असं रिचर्ड ब्रॅन्सन यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात यापेक्षा निम्म्या वेगाने प्रवास झाला, तरी दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचणार आहे.



हेही वाचा-

कॅ. अमोल यादव यांना विमाननिर्मितीसाठी पालघरमध्ये जागा, एमआयडीसीसोबत करार



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा