Advertisement

'तिच्या' नकारानंतरही उड्डाणाची जबरदस्ती, पायलटच्या पतीचा धक्कादायक आरोप

महिला पायलट मारिया झुबेरीने प्रसंगावधान दाखवत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात विमानाचं क्रॅश लँडिंग केलं. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं म्हणत एकीकडे मारियाचं कौतुक सुरू आहे. तर दुसरीकडे मारियाने हवामान खराब असल्याचं सांगत उड्डाणास नकार दिल्यावरही कंपनीने तिला विमान उडवण्याची सक्ती केल्याचा धक्कादायक आरोप मारियाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केला आहे.

'तिच्या' नकारानंतरही उड्डाणाची जबरदस्ती, पायलटच्या पतीचा धक्कादायक आरोप
SHARES

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात गुरूवारी २८ जूनला दुपारी सुमारे १.३० च्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळलं. या विमान दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. महिला पायलट मारिया झुबेरीने प्रसंगावधान दाखवत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात विमानाचं क्रॅश लँडिंग केलं. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं म्हणत एकीकडे मारियाचं कौतुक सुरू आहे. तर दुसरीकडे मारियाने हवामान खराब असल्याचं सांगत उड्डाणास नकार दिल्यावरही कंपनीने तिला विमान उडवण्याची सक्ती केल्याचा धक्कादायक आरोप मारियाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केला आहे.


कुणाच्या मालकीचं विमान?

किंग एअर सी ९० एअरक्राफ्ट VT-UPZ जातीचं हे विमान यू वाय एव्हिएशन कंपनीचं आहे. हे विमान कंपनीने काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतलं होतं. या विमानाची चाचणी करण्याआधी जुहू हॅलिपॅड इथं या विमानाची सकाळी विधीवत पूजाही करण्यात आली होती.


पत्नीसोबत संभाषण

या दुर्घटनेत मरण पावलेल्या पायलट मारिया झुबेरी यांनी विमानतळावरून पती प्रभात यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी प्रभात यांनी विमानाच्या चाचणीबाबत मारियाला विचारलं असता, आज हवामान खराब असल्यानं विमानाची चाचणी होणार नाही, असं सांगितलं. त्याआधी मारिया यांनी आपल्या सहकाऱ्यांना आज हवामान खराब आहे, त्यामुळे विमानाची चाचणी करणं धोकादायक ठरू शकतं असंही सांगितल होतं.


सूचनेकडे कंपनीचं दुर्लक्ष

त्यानंतर काही वेळाने दोघांमध्ये पुन्हा फोनवरून संभाषण झाल्यावर त्यात हवामान खराब असलं तरी देखील आज विमानाची चाचणी होईलच, अशी जबरदस्ती कंपनीने केल्याचं मारिया म्हणाल्या. मारिया यांनी हवामान खराब असल्याची सूचना कंपनीला केल्यावर तिचं काहीही न ऐकता विमानचं उड्डाण होणारच असं खडसावल्याची माहितीही मारिया यांनी पतीला दिल्याचं त्यांनी सांगितलं.


अनेकांचा जीव वाचवला

अखेर नाईलाजाने मारिया यांनी चाचणीसाठी विमान उडवताच विमानात काही तरी बिघाड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत घाटकोपरमधील मोकळ्या जागेत त्यांनी विमानाचं क्रॅश लँडिंग केलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. परंतु हवामान खराब असतानाही उड्डाण करण्याचा विमान कंपनीचा हट्टाहास गुरूवारी अनेकांच्या जीवावर बेतला असता. त्यामुळं लवकरात लवकर विमान कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी मारियाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी केली.

मारिया मीरारोड इथं राहणाऱ्या असून त्यांना १५ वर्षांची मुलगी आहे.हेही वाचा-

'ब्लॅक बॉक्स' म्हणजे काय रं भाऊ ?Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा