Advertisement

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड, सरकारकडून २ हजार रुपयांची भाऊबीजेची भेट

अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून २ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड, सरकारकडून २ हजार रुपयांची भाऊबीजेची भेट
SHARES

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून २ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार आहे.

कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणं तसंच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे; त्यामुळे दिवाळीआधीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचं महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार ३५३ अंगणवाडी मदतनीस व ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे.

हेही वाचा- एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी; शासनाकडून १ हजार कोटीचं पॅकेज जाहीर

याबाबत ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचविला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जाऊन महत्त्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असंही मंत्री अॅड.ठाकूर म्हणाल्या.

(anganwadi sevika will get 2 thousand rupees each from maharashtra government as a diwali gift)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा