महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर डीजे, लाऊडस्पीकरचा गोंगाट नाही!

सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे होणारा हा गोंगाट बंद करण्याची मागणी मुंबई महानगर पालिका आणि मुंबई पोलिसांकडे केली होती. ही मागणी पालिका आणि पोलिसांनी मान्य आहे.

SHARE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी दादर, चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी अभिवादनासाठी जमा होतात. मात्र, गेल्या काही वर्षांत ६ डिसेंबरला चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात डीजे आणि लाऊडस्पीकरचा गोंगाट वाढला आहे.


डीजे, लाऊडस्पीकरला नकार

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य नष्ट होत असल्याचे म्हणत आता आंबेडकर अनुयायी आणि संघटनांनी एकत्र येऊन सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे होणारा हा गोंगाट बंद करण्याची मागणी मुंबई महानगर पालिका आणि मुंबई पोलिसांकडे केली होती. ही मागणी पालिका आणि पोलिसांनी मान्य केल्याची माहिती अशी मागणी करणारे आंबेडकर अनुयायी निलेश दुपटे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. त्यामुळे यंदा ६ डिसेंबरला चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर डीजे आणि लाऊडस्पीकरचा गोंगाट नसणार किंवा हा गोंगाट कमी स्वरूपात असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात सीडी विक्रेत्यांसह इतर साहित्याचे स्टॉल मोठ्या संख्येने लावले जातात. ५ आणि ६ डिसेंबर रोजी व्यवसाय वाढवण्यासाठी या विक्रेत्यांमध्येच स्पर्धा दिसून येते आणि त्यामुळे डीजे आणि लाऊडस्पीकरचा गोंगाट अधिकाधिक केला जातो.


महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य नष्ट

"आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या लहान मुलांसह वृद्धांना या गोंगाटाचा त्रास होतोच. पण त्याचवेळी दु:खद, महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्यही नष्ट होते. १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरमध्ये काही फरक आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो", असे म्हणत आमच्यासह राज्यभरातील अांबेडकर अनुयायी आणि संघटनांनी हा गोंगाट बंद करण्याची मागणी केल्याचेही दुपटे यांनी स्पष्ट केले आहे.

१८ नोव्हेंबर रोजी यासंबंधीचे निविदेन पालिका आणि पोलिसांना देण्यात आले होते. तर सोशल मिडीयावरूनही यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, "ही मागणी मान्य केल्याचे पोलिस आणि पालिकेकडून सांगितले जात असल्याने हा गोंगाट बंद करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल," असा विश्वासही दुपटे यांनी व्यक्त केला आहे.

पालिका-पोलिसांकडून असे प्रयत्न न झाल्यास, गोंगाट सुरूच राहिल्यास मागणी करणाऱ्या संघटना शांततेत, हात जोडून हा गोंगाट बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी संघटनांच्या टीम तयार करण्यात आल्या असून, या टीम ६ डिसेंबरला वेगवेगळ्या ठिकाणी शांततेत गोंगाट बंद पाडण्याचे काम करणार आहेत.


आनंदराज आंबेडकरांचाही पाठिंबा

सहा डिसेंबरला गोंगाट बंद करण्याच्या मागणीला डॉ. आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य नष्ट होऊ द्यायचे नसेल, तर हा गोंगाट बंद व्हायलाच हवा. त्यामुळे ही मागणी करणाऱ्यांना आपला पाठिंबा असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.हेही वाचा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 12 विशेष ट्रेन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट बसगाड्यांची विशेष व्यवस्था


संबंधित विषय
ताज्या बातम्या