Advertisement

आरोपींवर याकूब मेमनसारखा हत्येचा गुन्हा नोंदवा - अॅड. प्रकाश आंबेडकर


आरोपींवर याकूब मेमनसारखा हत्येचा गुन्हा नोंदवा - अॅड. प्रकाश आंबेडकर
SHARES

भीमा कोरेगावला झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजीत होता. या हिंसाचारासाठी जनसमुदायाला भडकवण्यात आलं. त्यांना चिथवण्यात आलं, शस्त्रास्त्र पुरवण्यात आली. यामध्ये हिंदू एकता आघाडी आणि शिवराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे तसेच संभाजी भिडे गुरूजी यांचा हात आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मालमत्तांचं नुकसान झालं आहे. तरीही हे आरोपी अजून मोकाट का आहेत? असा माझा सरकारला सवाल आहे? या आरोपींना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर याकूब मेमनप्रमाणे ३०२ कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना व्यक्त केलं.


कार्यक्रमाला विरोध का केला?

२०० वर्षांपूर्वी पेशवाईविरोधात लढाई झाली. यांत अतुलेदार आणि बलुतेदार सहभागी होते. या सगळ्या लढाईकडे इतिहासात सामाजिक आशयाच्या दृष्टीकोनातून बघितलं जातं. कारण पेशवाईच्या काळात जी सामाजिक बंधनं घालण्यात आली होती. त्याच्याविरोधातला हा लढा होता. या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महाराष्ट्रातल्या शेकडो संघटना एकत्र आल्या. २५० संघटनांनी एकत्र होऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. लोकं येणारं, मानवंदना देणार आणि निघून जाणार असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं. जाहीर सभा नव्हत्या, कुणाची भाषणंही नव्हती. तरीही हिंदू संघटना चालवणारे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना मारहाण केली. गाड्या जाळल्या, परिसरात राहणाऱ्या लोकांच्या घरांवर दगडफेक केली. त्यात एकाचा मृत्यूही झाला. त्यामुळे माझा पहिला प्रश्न हा आहे की? हा विरोध तुम्ही का केला? असे कुठले मतभेत होते हे त्यांनी आधी स्पष्ट करावं.





आरोपींना अजून अटक का नाही?

हे सगळं होत असताना शासन गप्प का? हे गुन्हेगार आहेत, आरोपींना अजून अटक का नाही? असा माझा सवाल आहे. त्यांच्यावर तर आगोदरचेही गुन्हे आहेत. २-३ गुन्हे झाल्यावर पोलिस तडीपारीची कारवाई करते, यांच्यावर तडीपारीची कारवाई सोडून द्या, अजून अटकही झालेली नाही.


तुमचे मतभेद नाहीत, तर दंगल का करता?

या सामाजिक संघटना असूनही अराजकता माजवताहेत. हे लोकांपुढे आपण आणलं पाहिजे. तुमचे मतभेद नाहीत, तर दंगल का करता? त्यामुळे समाजात अराजकता माजवणं हेच या संघटनांचा अजेंडा असल्याचं स्पष्ट होत आहे. आमचा शासनाला प्रश्न आहे की तुम्हाला शांततेची व्यवस्था आहे की अराजकता हवी आहे?


हिंदू संघटना हिंदूंचाच बळी घेताहेत

हिंदू संघटनांची ताकद एवढी वाढलीय की ते हिंदूंनाच आता मारायला लागले आहेत. हिंदूंचाच बळी घ्यायला लागले आहेत. तेव्हा अशा संघनांना टाॅलरेट करायचं का? अशा लोकांसोबत राहायचं का? याचा निर्णय आता सर्वसामान्य हिंदूंनी घ्यायची गरज आहे. बंदच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतानाच आम्ही या संघटनांना संधी देत आहोत की त्यांनी सुद्धा याविरोधात आवाज उठवावा. सामान्य माणसाने या आंदोलनातून आम्ही आराजकतेच्या बाजूने नाही, हे दाखवून दिलं आहे.



अॅक्ट्राॅसिटी काढा, कलम ३०२ लावा

भीमा-कोरेगावमध्ये हिंसाचार घडवून आणणारे हे आलुतेदार बलुतेदारांचं संघटन असल्याने शासनाने त्यांच्यावर लावलेला अॅक्ट्राॅसिटीचा गुन्हा ताबडतोब काढून टाकावा ही आमची पहिली मागणी आहे.


सुप्रीम कोर्टाची गाईडलाइन विचारात घ्या

दुसरी मागणी अशी आहे की हिंसाचार घडवून आणणाऱ्यांवर, कट रचणाऱ्यांवर ३०२ कलमांतर्गत गुन्हे नोंदवावेत. कारण सुप्रीम कोर्टाने याकूब मेमन प्रकरणातही गाईडलाईन दिली होती. याकूब मेमन प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नव्हता, तरी त्याने गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्र पुरवली होती, जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रत्यक्ष गुन्हा घडवणारे जितके दोषी, तितकेच मदत करणारेही दोषी आहेत, याचा विचार करून शासनाने त्यांच्यावर ३०२ कलम लावावे, कडक कारवाई करावे.


तरच आंदोलन शांत होईल...

मुंबईत कार्यकर्ते रस्त्यावर, त्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आम्ही आवाहन करत आहोत. आम्ही दिलेल्या नावांवर शासनाने त्वरीत कारवाई केली, तर आंदोलन लवकर शांत होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा