Advertisement

आरोग्यसेविकांच्या मुद्यावर भाजपाकडून सेनेला चेकमेट


आरोग्यसेविकांच्या मुद्यावर भाजपाकडून सेनेला चेकमेट
SHARES

मानधनात वाढ, प्रसुती रजा आदी मागण्यांसाठी आरोग्य सेविकांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात अालं. मात्र, आरोग्य सेविकांच्या या मागणीबाबत शिवसेनेने विधीमंडळ आणि महापालिका सभागृहात आवाज उठवून प्रशासनाला जागे केले असले प्रत्यक्षात या आंदोलनात थेट भाजपानेच उडी घेत सेनेचा हा मुद्दा हायजॅक केला.

आंदोलनादिवशी शिवसेनेच्या एकाही नेत्याने त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने या आंदोलकांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून सकारात्मक आश्वासन घेतले. त्यामुळे सेनेला याही मुद्दयावर पाणी सोडावं लागलं आहे.


विधीमंडळात आवाज उठवला 

मुंबईतील शहर व उपनगरांमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य सेविकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याच्या मुद्दयावरून शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विधीमंडळात आवाज उठवला होता. त्यानंतर शिवसेनेने हा मुद्दा महापालिकेत उपस्थित करून रान उठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मागील आठवड्यात महापालिका सभागृहात यावर आवाज उठवून आरोग्य सेविकांच्या विविध मागण्या असून त्या जर आपण मान्य केल्या नाहीत तर त्या आंदोलन पुकारतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे या आरोग्य सेविकांचं मानधन पाच हजार ऐवजी दहा हजार रुपये एवढं करावं, अशी मागणी त्यांनी केली.


सेनेकडून अांदोलकांची भेट नाही

शितल म्हात्रे यांच्यानंतर शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी याच मुद्यावरून स्थायी समितीच्या सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतंही सकारात्मक पाऊल उचललं न गेल्यामुळे मुंबईतील सर्व आरोग्य सेविकांनी आझाद मैदानावर शुक्रवारपासून आंदोलन पुकारलं.  परंतु दिवसभरात या आरोग्य सेविकांची भेट शिवसेनेच्या एकाही नेत्यानं अथवा नगरसेवकांनी घेतली नाही.


आशिष शेलार यांचा पुढाकार

भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी त्याच दिवशी संध्याकाळी या आरोग्यसेविकांची भेट घेतली आणि आपल्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीनं अॅड. प्रकाश देवदास यांनी आरोग्यसेविकांचे प्रश्न मांडले. या सर्व सुविधा मिळाव्यात. तसेच त्यांचा मानवतेच्या दृष्टीने विचार करण्यात यावा, असा आग्रह धरत शेलार यांनी त्यांची बाजू मांडली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे सहा दिवसांत पुढील संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक मागणी व त्याबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदी याबाबत उहापोह करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी शेलार आणि आरोग्य सेविकांच्या शिष्टमंडळाला दिले.


शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

त्यानंतर शिवसेनेकडून पळापळ सुरु झाली आणि माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव आणि शीतल म्हात्रे यांनी आंदोलन करत्या आरोग्य सेविकांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली. परंतु शिवसेनेवर पुन्हा  कडी करत या सर्व आरोग्य सेविकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस घेऊन जाऊन आशिष शेलार यांनी सेनेचा पुन्हा एकदा डाव हाणून पडला. 

 यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने आयुक्तांना फोन करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले. तसंच या सेविकांचे आझाद मैदान येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर अारोग्यसेविकांचा संप मागे घेण्यात अाला. मंगळवारी या विषयावर महापालिका आयुक्तांकडे महत्वाची संयुक्त बैठक घेऊन त्यात निर्णय घेतला जाणार असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा - 

गणेशोत्सव मंडळाचा एकही अर्ज प्रलंबित ठेवू नका : आयुक्त

तुरूंगातून आरोपीला करायचीय बिल्डरविरोधात महारेरात तक्रार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा