Advertisement

आता भाजपाच्या भात्यातील बाण सुटणार!


आता भाजपाच्या भात्यातील बाण सुटणार!
SHARES

मुंबई महापालिकेत पहारेकरीची चोख भूमिका बजावणारी भाजपा आता अधिक आक्रमक दिसणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीने सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केले होते. पण त्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी या आक्रमकपणाला मुरड घातली होती. पण आता राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आपल्या भात्यातील बाण बाहेर काढून शिवसेनेला घायाळ करणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन करत दुसऱ्या क्रमांकावर आपल्या पक्षाला नेऊन ठेवले. सत्तेपासून काही जागा कमी पडत असताना फोडाफोडीचे राजकारण न करता भाजपाने महापालिकेत पहारेकरी म्हणून भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भाजपाने महापालिकेत विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधून प्रस्ताव मागे घ्यायला भाग पाडले. भाजपाच्या आक्रमकतेपुढे शिवसेनेचे महापालिकेतील नेते हतबलही ठरत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या महापालिका नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली होती.

भाजपा नगरसेवक बंधनमुक्त...

राणीबागेतील तिकीट दरवाढीचा मुद्दा असेल वा आरेतील मेट्रो कारशेडचा प्रस्ताव असो. यावर भाजपाने आवाज उठवला नाही. राणीबाग शुल्कवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर झाल्यानंतर तसेच मेट्रो कारशेड आरक्षणाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहात त्या विरोधात निर्णय घ्यायला लावू, असे सांगणारे भाजपचे नेते प्रत्यक्षात चिडीचूप राहिले. वरिष्ठ नेत्यांकडून शांत राहण्याचे संदेश मिळाल्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी सभागृहातील अक्रमकतेला मुरड घातली, असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु आता या बंधनातून भाजपाचे महापालिका सदस्य मुक्त झाले आहेत.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक थोडे शांत होते. मुख्यमंत्र्यांचे तसेच मुंबई अध्यक्षांचे तसे आदेश होते. खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ही निवडणूक निर्विघ्न व्हावी, अशी इच्छा होती. त्यामुळे सर्व घटक पक्षांच्या भावना दुखवू नये, असेच सांगण्यात आले होते. पण आता राष्ट्रपती निवडणूक पार पडली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाचे नेते आणि नगरसेवक आक्रमक दिसतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्याशी संपर्क साधला असता, लोकहिताच्या प्रश्नामध्ये आम्हाला राजकारण आणायचे नाही, असे सांगत जिथे गैरव्यवहार, गैरकारभार तसेच घोटाळे आणि भ्रष्टाचार केला जात असेल तर, तिथे पहारेकरी म्हणून आवाज उठवून त्याला लगाम घातला जाईल. मग तिथे सत्ताधारी पक्ष असो वा प्रशासन. पण एक निश्चित की यापुढे भाजपाचे नगरसेवक तुम्हाला अधिक आक्रमक दिसतील. सध्या बरेच मुद्दे आमच्या हाती आहेत. त्या मुद्द्यांचा वापर योग्यवेळी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा -

कोविंद यांना मिळालेली 'ती' 22 मते कोणाची?

...आणि राज पुरोहित यांचा पारा चढला!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा