Advertisement

तुळशीवाडीच्या 'बेंटेक्स फॅक्टरी'तील अनधिकृत बांधकामावर हातोडा


तुळशीवाडीच्या 'बेंटेक्स फॅक्टरी'तील अनधिकृत बांधकामावर हातोडा
SHARES

ताडदेव परिसराच्या तुळशीवाडीतल्या सिताराम घाडीगावकर मार्गावरील एका अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. 'बेंटेक्स फॅक्टरी'तल्या एका इमारतीच्या तळमजल्यावर हे बांधकाम करण्यात आले होते. मंगळवारी मुंबई महानगर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली.


दीड हजार चौरस फुटांचे बांधकाम

या ठिकाणी तब्बल १ हजार ५६० चौरस फूट आकाराचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणच्या सर्व बांधकामांची आराखड्यानुसार पाहणी करून ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळून येईल, त्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्पष्ट केले.


प्रकरण होते न्यायप्रविष्ट

या अनधिकृत बांधकामांबाबत सन २०१५ मध्ये महापालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, या नोटीस विरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांनी या नोटीसला स्थगिती आदेश दिले होते. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांचा तिढा न्यायालयात सुरु होता.


१२ तासांत पालिकेकडून कारवाई

परंतु, न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाबाबत सोमवारी संध्याकाळी सुमारे ४ वाजता स्थगिती आदेश उठविण्यात आले. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत महापालिकेकडून तोडक कारवाई हाती घेण्यात आली.


मंगळवारी सकाळी ९ वाजता ही कारवाई हाती घेण्यात आली असून बुधवारपर्यंत येथील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम पूर्ण होईल.

विश्वास मोटे, सहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग


तोडकामाचा खर्च मालमत्ता करात जोडला जाणार

या कारवाईदरम्यान महापालिकेला आलेला खर्च हा संबंधितांच्या मालमत्ता करात जोडला जाणार आहे. तसेच 'बेंटेक्स फॅक्टरी' या परिसराबाबत मूळ कागदपत्रे व मंजूर आराखडे प्राप्त करुन त्या आधारे बांधकामांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीदरम्यान ज्या अनधिकृत बाबी आढळून येतील, त्यांच्यावर देखील महापालिकेच्या नियम व पद्धतींनुसार कारवाई करण्यात येईल, असेही मोटे यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

जे. एन. उद्यानातील अपंग महासंघाच्या कार्यालयावर हातोडा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा