Advertisement

पालिकेची धडक कारवाई सुरूच, वांद्रे-अंधेरीत बांधकामं भुईसपाट!

गेल्या दोन दिवसांत पालिकेकडून वांद्रे आणि अंधेरीतील नामांकित रेस्टॉरंटला दणका देण्यात आला आहे. एच विभागातील कॅफे बांद्रा आणि लगुना बार तर अंधेरीतील चायना गेट आणि टॅप अशा नामांकित रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम पालिकेकडून भुईसपाट करण्यात आले आहे.

पालिकेची धडक कारवाई सुरूच, वांद्रे-अंधेरीत बांधकामं भुईसपाट!
SHARES

कमला मिल आग प्रकरणानंतर जाग आलेल्या मुंबई महानगर पालिकेकडून रेस्टॉरंट, हॉटेल-पबच्या अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई अजूनही सुरू असून गेल्या दोन दिवसांत पालिकेकडून वांद्रे आणि अंधेरीतील नामांकित रेस्टॉरंटला दणका देण्यात आला आहे. एच विभागातील कॅफे बांद्रा आणि लगुना बार तर अंधेरीतील चायना गेट आणि टॅप अशा नामांकित रेस्टॉरंटचे अनधिकृत बांधकाम पालिकेकडून भुईसपाट करण्यात आले आहे.


२६०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडले

कमला मिल आगीनंतर पालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामाविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा जोरात सुरू आहे. त्यानुसार पालिकेच्या एच पश्चिम विभागाने गेल्या दोन दिवसांत वांद्रे पश्चिम विभागात कारवाई केली असून वॉटरफिल्ड रोड येथील लगुना बारचे दोन हजार चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम पालिकेकडून तोडण्यात आले आहे. याच परिसरातील कॅफे बांद्राचे ६०० चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.


आधी कारवाई, पण पुन्हा केलं बांधकाम!

दरम्यान, लगुना बारचे अनधिकृत बांधकाम नोव्हेंबर २०१७ मध्येच पालिकेकडून तोडण्यात आले होते. पण नंतर पुन्हा येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. तर या रेस्टॉरंटने न्यायालयात आणि पालिकेच्या इमारत प्रस्ताव खात्याकडे या कारवाईविरोधात विनंती अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालय आणि इमारत प्रस्ताव खात्याने हे विनंती अर्ज फेटाळत लगुना बारला दणका दिला होता. त्यानुसार पालिकेकडूनही ही तोडक कारवाई करण्यात आल्याचेही उघडे यांनी सांगितले आहे.


अंधेरीच्या चायना गेटवरही हातोडा!

याचवेळी दुसरीकडे अंधेरी पश्चिमेलाही पालिकेकडून जोरदार कारवाई सुरू होती. गेल्या दोन दिवसांत पालिकेच्या के विभागाने अंधेरी पश्चिम येथील दोन नामांकित रेस्टॉरंटला दणका देत त्यांचे अनधिकृत बांधकाम तोडले आहे. न्यू लिंकवरील प्रसिद्ध अशा चायना गेट रेस्टॉरंट आणि टॅप या दोन रेस्टॉरंटविरोधातील ही कारवाई आहे.

न्यू लिंक रोडवरील रॉयल प्लाझा सोसायटीमधील तळ मजल्यावर टॅप हे रेस्टॉरंट असून या रेस्टॉरंटच्या मागील आणि पुढील बाजूस अनधिकृत शेड उभारून त्याचा डायनिंग एरियासारखा वापर केला जात होता. तर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या चायना गेट रेस्टॉरंटनेही अनधिकृत बांधकाम केले होते. त्यामुळे या दोन्ही रेस्टॉरंटचे मिळून दोन हजार चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, या दोन्ही रेस्टॉरंटला पालिका अधिनियमानुसार यापूर्वीच ३५१ नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या दोन्ही रेस्टॉरंटविरोधात ही तोडक कारवाई करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा