Advertisement

तरीही शहाणपण नाही..पुन्हा कंत्राट त्याच कंपन्यांना देण्याचा घाट


तरीही शहाणपण नाही..पुन्हा कंत्राट त्याच कंपन्यांना देण्याचा घाट
SHARES

मुंबईतील कचऱ्याच्या वादग्रस्त कंत्राट कामांचे चार प्रस्ताव स्थायी समितीने रोखून ठेवलेले असतानाच आता आणखी एका कामाचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी आणला आहे. अंधेरी-जोगेश्वरी पूर्व भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी झिरो वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. पण ही कंपनीही समय परिवहन प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. यातील समय कंपनीचे डायरेक्टर्स हे कविराज या काळ्या यादीतील कंपनीशी संलग्न असलेल्या ग्लोबल वेस्ट या कंपनीतही असल्यामुळे हे कंत्राट वादात अडकले होते. पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पुढे रेटून ग्लोबल वेस्ट कंपनीला वाचवण्याचा घाट घातला आहे.


तरीही प्रस्ताव स्थायी समितीपुढे

मुंबईतील के-पूर्व विभागातील सात वर्षांच्या कालावधीसाठी कचरा वाहून नेणारी वाहने भाडे तत्त्वावर घेण्याबाबचे कंत्राट एम. के.  एंटरप्रायझेस, गल्फ हॉटेल आणि समय परिवहन यांची संयुक्त भागीदारी असलेल्या झिरो वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला देण्यात येत आहे. यासाठी सात वर्षांसाठी १२२ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. पण झिरो वेस्ट यांचे संयुक्त भागीदार असलेल्या समय परिवहन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नालेसफाई प्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या विश्वशक्ती कन्स्ट्रक्शन यांच्या भागीदाराची पत्नी संचालक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मागील अनेक दिवसांपासून विधी विभागाच्या अभिप्रायासाठी अडकून पडला होता. परंतु, आता या समय परिवहन आणि ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला मदत करण्यासाठी सकारात्मक अभिप्राय घेऊन हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला गेला आहे.


प्रस्ताव मंजूर होणार?

काळ्या यादीत टाकण्याचा आदेश विश्वशक्ती कन्स्ट्रक्शन यांचे भागीदार आणि प्राधिकृत स्वाक्षरीधारक यांनाच लागू होतो. त्यामुळे जरी संबंधित कंपनीच्या भागीदाराची पत्नी या कंपनीत संचालक असली तरी त्या कंपनीवर विश्वशक्ती यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयाचा काहीच परिणाम होत नाही, अशा प्रकारचा अहवाल संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांच्या अभिप्रायासह सादर केला आहे. त्यामुळे या निविदेची शिफारस करण्याची काहीच हरकत नसल्याचे सांगून कचऱ्याचा एकूण १४ पैकी सहावा प्रस्ताव पुढे रेटला आहे. यापैकी एक प्रस्ताव मंजूर झाला असून चार प्रस्ताव मागील तीन बैठकांपासून रोखून धरण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच्या चार आणि अंधेरी पूर्व भागातील या कचऱ्याचे प्रस्ताव रेकॉर्ड केले जातात की मंजूर होतात यावर सर्वांचे लक्ष आहे.



हेही वाचा

तर, महापालिकेचं कचरा कंत्राटात कोट्यवधींचं नुकसान!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा