Advertisement

रस्त्यांवर कुत्र्याने शी केलीय? उचला आणि कचरा पेटीत टाका

पाळीव प्राण्यांसह सार्वजनिक ठिकाणी फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. पाळीव प्राण्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

रस्त्यांवर कुत्र्याने शी केलीय? उचला आणि कचरा पेटीत टाका
SHARES

गिरगाव चौपाटी, पेडर रोड, नेपियन्सी रोडवर अनेक जण पाळीव कुत्रे फिरण्यासाठी घेऊन येतात. अनेकदा या पाळीव कुत्र्यांची विष्ठा रस्त्यांवर पडून दुर्गंधी पसरते. त्यामुळे या पाळीव कुत्र्यांची विष्ठा रस्त्यांवर सोडून काढता पाय घेणाऱ्या नागरिकांना यापुढे ते उचलून कचरा पेटीत टाकावं लागणार आहे. नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल.


जनजागृती मोहीम सुरू

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर अनेक श्वान मालक किंवा संबंधित 'केअर टेकर' हे आपल्या घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशावेळी अनेकदा रस्त्यावर, पदपथावर वा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होण्यासोबतच अनारोग्याचा प्रश्नही उद्भवू शकतो. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या 'डी' विभागाने याबाबत विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. 


असं केल्यास ५०० रुपये दंड

पालिकेच्या जनजागृती मोहिमेंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येणाऱ्या व्यक्तींचं प्रबोधन केलं जात आहे. तसेच कुत्र्याने घाण केल्यास 'बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी - २००६' नुसार प्रत्येकवेळी ५०० रुपये एवढा दंड देखील करण्यात येत आहे. यानुसार गेल्या ३ दिवसांत १६ व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.


म्हणून 'ही' मोहीम सुरू

महापालिकेच्या 'डी' विभागामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, चर्नी रोड, ताडदेव, गोपाळराव देखमुख मार्ग (पेडर रोड), लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपियन्सी रोड) इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होतो. या परिसरात पाळीव प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. पाळीव प्राण्यांसह सार्वजनिक ठिकाणी फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. पाळीव प्राण्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.


३२ व्यक्तींचं पथक कार्यरत

जनजागृती मोहिमेसाठी ३२ व्यक्तींचं पथक कार्यरत आहे. याव्यक्ती 'डी' विभागातील विविध ठिकाणी फिरुन आणि पाहणी करून पाळीव प्राण्यांच्या मालकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा उत्सर्जित केल्यास अशी विष्ठा उचलण्यासाठी 'शिट लिफ्टर' हे उपकरण वापरून ती परिसरातील कचऱ्याच्या डब्यात कशी टाकावी? याचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं जात आहे. तसेच कुत्र्याने घाण केल्यास त्याबाबत महापालिकेच्या नियमांनुसार प्रत्येकवेळी ५०० रुपये एवढी दंड वसूली देखील करण्यात येत आहे. यानुसार गेल्या ३ दिवसांत १६ प्रकरणी दंड वसुली करण्यात आली आहे, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त मोटे यांनी दिली आहे.


हेही वाचा - 

प्राण्यांपासून कसा होतो माणसांना आजार? मुंबई महापालिका घेणार शोध

मॅड अबाऊट डॉग्स? मग तुमच्यासाठी आहेत हे 'मॅड सेंटर्स'!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा