Advertisement

मुंबईच्या महापौरांना आयुक्तच जुमानेनात!


मुंबईच्या महापौरांना आयुक्तच जुमानेनात!
SHARES

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सध्या महापालिका आयुक्त अजोय मेहता हे जुमानतच नसल्याचे समोर आले आहे. मस्तीत चालणाऱ्या आयुक्तांना लोळवण्यात सत्ताधारी शिवसेनेचीही शक्ती कमजोर ठरू लागली आहे. खुद्द महापौर आणि शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांना याची ना खेद ना खंत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.


महापालिकेत सत्ताधारी पक्ष कमजोर

एकीकडे आयुक्तांना विरोध करायचा आणि दुसरीकडे आयुक्तांच्या दालनातच चहापान करत असल्यामुळे दिवसेंदिवस महापालिकेत सत्ताधारी पक्ष कमजोर ठरू लागला आहे. परिणामी आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची मस्ती वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आतापर्यंत गटनेत्यांसह दोन वेळा पाहणीदौरा आयोजित केला. यापैकी एक पाहणी दौरा हा माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींचा होता. पण माहुलमधील पाहणीवेळी अजोय मेहता आणि त्यांचे अतिरिक्त आयुक्त हे उपस्थितच राहिले नव्हते. एवढेच काय, तर उपायुक्तही हजर राहिले नाहीत. विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला पाठवून महापौरांसह गटनेत्यांची बोवळण करण्यात आली. 


पालिका आयुक्त महापौरांचे ऐकेनात

या पाहणीनंतरही महापौरांनी सभागृहांमध्ये आदेश देऊन जोपर्यंत माहुलमध्ये सेवासुविधा पुरवल्या जात नाही, तोपर्यंत एकाही कुटुंबाचे पुनर्वसन तिथे केले जाऊ नये, असे आदेश प्रशासनाला दिले होते. पण या आदेशालाच अजोय मेहता यांनी झुगारून सध्या सुरू असलेल्या जलवाहिनीलगतच्या पात्र झोपड्यांमधील कुटुंबांचे पुनर्वसन तिथे करण्यास सुरुवात केली आहे. अखेर बुधवारी याच मुद्दयावरून शिवसेनेच्या नगरसेवकांवर सभा तहकुबी मांडायची वेळ आली.


तरीही शिवसेना गप्प का?

याव्यतिरिक्त १५ दिवसांपूर्वी मेट्रो प्रकल्प-३ अंतर्गत होणाऱ्या कत्तलीसंदर्भात आरे कॉलनीतील झाडांची पाहणी करण्यात आली. या पाहणीलाही वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून अजोय मेहता उपस्थित राहिले नाहीत. इतकेच काय, तर अतिरिक्त आयुक्त आणि उपाध्यक्ष यांनाही पाठवले नाही. फक्त उद्यान विभागाच्या अधिक्षकांना पाठवून अजोय मेहता यांनी महापौरांसह सर्व गटनेत्यांना त्यांची एक प्रकारे जागा दाखवली. मात्र, आयुक्तांच्या न येण्यावर महापौरांसह शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांनी चकार शब्दही काढला नाही.


शिवसेना पक्ष आता महापालिकेत कमजोर?

या सर्व प्रकारामुळे सत्ताधारी पक्ष हा सध्या आयुक्तांच्या ताटाखालील मांजर झाल्यासारखे वागत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. एकेकाळी व्ही. रंगनाथन, करुण श्रीवास्तव आदी नडणाऱ्या आयुक्तांना भिडण्याची ताकद असलेला शिवसेना पक्ष आता महापालिकेत कमजोर होत चालला असल्याचे दिसून येत आहे.



हेही वाचा

'तुम्ही सिंघम, तर आम्हीही सिंघम', नगरसेवकांचे आयुक्तांना आव्हान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा