Advertisement

मुंबईतील ५ प्रमुख नद्या आणि २ तलावांवर रडार लेव्हल ट्रान्समीटर

पावसाळ्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अथवा तलाव धोकादायकरीत्या ओव्हर फ्लो झाल्यास धोक्याचा इशारा आपत्कालीन नियंत्रण कक्षापर्यंत तात्काळ पोहोचणार आहे.

मुंबईतील ५ प्रमुख नद्या आणि २ तलावांवर रडार लेव्हल ट्रान्समीटर
SHARES

मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास ठिकठिकाणी पाणी साचतं. पाणी साचल्यानं रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प होते. परिणामी मुंबईच्या वाहतुकसेवाला ब्रेक लागतो. त्यामुळं यंदा महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील ५ प्रमुख नद्या आणि २ तलावांवर 'रडार लेव्हल ट्रान्समीटर' बसविले आहेत. त्यामुळं पावसाळ्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अथवा तलाव धोकादायकरीत्या ओव्हर फ्लो झाल्यास धोक्याचा इशारा आपत्कालीन नियंत्रण कक्षापर्यंत तात्काळ पोहोचणार आहे.

अतिक्रमणामुळं नाल्यांमध्ये रूपांतरित झालेल्या नद्यांनी पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडल्यास स्थानिक परिसरात पूर येतो. मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीवर प्रत्येक पावसाळ्यात पालिका यंत्रणा बारीक लक्ष ठेवत असते. २६ जुलै २००५ रोजी मिठी नदीला पूर आल्यानं मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. तसंच, ओशिवरा, दहिसर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं पश्चिम उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

यामुळं ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी आणि नाल्यांचं रुंदीकरण केलं जात आहे. तर आता या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात नद्यांना येणाऱ्या पुराचा अंदाज येण्यासाठी रडार लेव्हर ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये मिठी, ओशिवरा, पोयसर, दहिसर आणि वाकोला नदी व पवई, विहार तलावाचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टी होऊन मुंबईची तुंबापुरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नाल्यांबरोबरच नद्यांच्या पातळीवरही महापालिकेने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

नद्यांना अचानक पूर आल्यास रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ येते. या आपत्कालीन स्थितीत जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका असतो. यासाठी आपत्कालीन स्थितीची माहिती मिळवून तातडीने उपाययोजना करण्यासाठी रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी पर्जन्यवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिलिमीटर एवढी वाढवण्यात येत आहे. तसेच सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधले असून आणखी दोन पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे.



हेही वाचा -

यंदा पावसाळ्यात मुंबईत २९१ ठिकाणी पाणी तुंबणार?

कोरोना चाचण्यांबाबत पालिकेची पुन्हा एकदा नवी नियमावली



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा