शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचे : महापालिकेत ठराव मंजूर, पण अंमलबजावणी नाही

BMC
शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचे : महापालिकेत ठराव मंजूर, पण अंमलबजावणी नाही
शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचे : महापालिकेत ठराव मंजूर, पण अंमलबजावणी नाही
See all
मुंबई  -  

वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीतावरून वाद निर्माण झालेला असतानाच मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच सर्व अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा वंदे मातरम् गाण्याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीने मांडलेली ठरावाची सूचना सभागृहात मंजूर केल्यामुळे यातील 'सक्तीच्या' या शब्दप्रयोगाला समाजवादी पार्टीसह काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. या सूचनेला सपासह काँग्रेसनेही विरोध दर्शवत मतदानाची मागणी केली. परंतु, महापौरांनी आपली मनमानी करत हा ठराव मंजूर केल्यामुळे सपाच्या नगरसेवकांनी सभात्याग करत याचा निषेध नोंदवला.


महापालिका समित्यांमध्येही बंधनकारक

राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना सदोदित तेवत असावी म्हणून अलीकडेच चेन्नई उच्च न्यायालयाच्या तामिळनाडूमधील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा म्हणजेच सोमवारी किंवा शुक्रवारी वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे देशाचे जबाबदार नागरिक म्हणून भावी पिढीच्या मनात देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत रहावी, याकरता मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा आणि इतर अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा तसेच महापालिकेच्या वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांच्या बैठकांमध्ये सुरुवातीला ‘वंदे मातरम’ हे म्हणण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली.


पोलच्या मागणीकडे दुर्लक्ष

ही ठरावाची सूचना संदीप पटेल यांनी मांडली असता सपासह काँग्रेसमधील मुस्लिम नगरसेवकांनी पोलची मागणी केली. विरोधी पक्षनेते यांनी महापौरांनी ही सूचना मंजूर करण्यापूर्वी यापूर्वी अशाच प्रकारे मांडलेल्या सूचनेला प्रशासनाकडून आलेल्या अभिप्रायाची कागदपत्रे सादर केली आणि यावर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी हा ठराव मतास टाकून मंजूर केला.


आयुक्तांच्या अभिप्रायनंतरच पुढील कार्यवाही

महापौरांनी हा ठराव मंजूर केल्यामुळे सपाचे गटनेते रईस शेख यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महापौरांच्या मनमानीपणा तसेच भाजपाच्या चाणक्यनितीचा निषेध व्यक्त करत मुस्लिम नगरसेवकांसह सभात्याग केला. दरम्यान, 'आपण हा ठराव मंजूर करून आयुक्तांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय अभिप्राय देते ते पाहू. परंतु हा ठराव मंजूर झाला म्हणून त्वरीत याची अंमलबजावणी होईल, असे काहीही नाही. प्रशासनाकडून आलेल्या अभिप्रायनंतरच पुढील  निर्णय घेतला जाईल', असे महापौरांनी सांगितले.


सक्ती नसावी

लोकशाहीत कुणावरही कसलीही सक्ती करता येत नाही. त्यामुळे ‘सक्ती’ या शब्दाला आमचा विरोध आहे. २००४मध्ये अशाच प्रकारे ठरावाची सूचना मंजूर करण्यात आली होती. परंतु त्यावर तत्कालिन आयुक्तांनी आपण सक्ती करु शकत नाही, असा अभिप्राय दिला होता. त्यामुळे वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती नसावी, असे आमचे म्हणणे असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले.


महापौरांची हिटलरशाही

वंदे मातरम् या गीताला आमचा विरोध नाही. परंतु भाजपा मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे गीत गाणे बंधनकारक करण्यास आमचा विरोध आहे. महापौरांना आपल्या विभागातील समस्या सोडवण्यासाठी लावलेल्या बैठकीची घाई होती. त्यांच्या पक्षाचे नेते तिथे येवून बसल्यामुळे त्यांना तिथे जायचे होते. त्यामुळे त्यांचं आमच्याकडे लक्ष नसून त्यांच्या या हिटलरशाही प्रवृत्तीचा, त्यांच्या मनमानी कारभाराचा तसेच भाजपाच्या चाणक्यनितीचा निषेध करण्यासाठी सभात्याग केल्याचे सपाचे गटनेते रईस शेख यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

जीएसटीचा दुसराच हप्ता चुकला, धनादेशाची वाट पाहतेय महापालिका


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.