अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अवैध पार्किंग करणाऱ्यांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या दंडाची रक्कम जास्त असल्यानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. परंतु, आता महापालिकेनं आकारलेला ५ ते २३ हजारांपर्यंतचा दंड आता आणखी कमी होणार आहे.
पार्किंग दराच्या ४० पट तर वर्दळीच्या मार्गांवर ८० पट दंड आकारला जाणार आहे. म्हणजे १८०० ते ४ हजारांपर्यंत ही दंड आकारणी होणार आहे. तसंच, वर्दळ असलेल्या मार्गांवरील वाहनतळ शुल्कही दुप्पट करण्यात आले आहे. याबाबत महापालिकेनं सुधारित परिपत्रक जारी केलं आहे. मात्र, परिपत्रकातील दरही खूप जास्त असल्याचा आरोप करत ते कमी केले जावेत, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मागील वर्षी ७ जुलैपासून पालिकेच्या वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत अवैध पार्किंग करणाऱ्यांवर ५ ते २३ हजारांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र हा दर जास्त असल्यानं वाहनचालक व महापालिका कर्मचारी यांच्यात वाद होत होते. त्यामुळं या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेनं आता वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत पार्किंग केल्यास ४० पट दंड भरावा लागणार आहे.
| गाडी | पूर्वीचा दंड (रु.) | सुधारित दंड (रु.) |
| दुचाकी | ५ हजार | १८०० |
| तीन-चारचाकी | १० हजार | ४ हजार |
| रिक्षा, टॅक्सी | ८ हजार | ४ हजार |
| सार्वजनिक बस | ७ हजार | ७ हजार |
| अवजड वाहने | १५ हजार | १० हजार |
महत्त्वाच्या रस्त्यांसाठीचा दर
| गाडी | पूर्वीचा (रु.) | सुधारित (रु.) |
| दुचाकी | ५ हजार | ३ हजार ४०० |
| तीन-चारचाकी | १० हजार | ८ हजार |
| रिक्षा, टॅक्सी | ८ हजार | ४ हजार |
| सार्वजनिक बस | ७ हजार | १४ हजार |
| अवजड वाहने | १० हजार | ९ हजार ८०० |
| गाडी | पूर्वीचे (रु.) | सुधारित (रु.) |
| दुचाकी | ४५ | ८५ |
| तीन-चारचाकी | १०० | २०० |
| रिक्षा, टॅक्सी | १०० | १०० |
| सार्वजनिक बस | १७५ | ३५० |
हेही वाचा -
रिक्षा-टॅक्सी चालकांची ३ रुपये भाडेवाढीची मागणी
हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा मृत्यू
