Advertisement

सरकारी वसाहतीतील कचरा उचलणे बंद!


सरकारी वसाहतीतील कचरा उचलणे बंद!
SHARES

मुंबईतील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या वसाहतींनी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत: न लावल्यास त्यांचा कचरा उचलणे बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

शीव, अँटॉप हिलसह अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम भागांमध्ये कचरा उचलणे बंद केले असून परिणामी वसाहतींमध्ये कचऱ्याचे ढिग जमा होऊन दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आता नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी बुधवारी प्रशासनावरच हल्ला चढवला आहे.


संतप्त नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल

'आयुक्तांची जर अशा प्रकारे दादागिरी चालणार असेल, तर ती मोडून टाकण्याची धमक आमच्यात आहे. जर या वसाहतींमधील कचरा न उचलल्यास तोच कचरा गाड्यांमध्ये भरुन सहायक आयुक्त आणि प्रसंगी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनाबाहेर आणून टाकू', असा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.

"मुंबईतील मोठ्या वसाहतींनी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे त्या ठिकाणचा कचरा उचलणे महापालिकेने बंद केल्याचे सांगत अशा प्रकारे जर आयुक्तांची दादागिरी सुरु असेल तर ती चालू देणार नाही," असा इशारा शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी दिला.

यावर शिवसेनेच्या मंगेश सातमकर यांनी "महापालिका अधिनियम ६३ (क) नुसार कचरा कुंडीपर्यंत कचरा आणून टाकणे, ही नागरिकांची जबाबदारी आहे, तर कचरा कुंडीपासून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा वाहून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महापालिकेची असल्याचे सांगत याची सक्ती करताना नागरिकांना वेळ द्यावा," अशी मागणी केली.

"शीव-अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनी ही शासकीय वसाहत असून त्याठिकाणी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे तेथील कचरा उचलणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून 'हे कसले मुंबई स्वच्छ भारत अभियान?" असा सवाल मंगेश सातमकर यांनी केला. "ही योजना हार्ड आणि फास्ट न राबवता सर्वांना संधी द्या," असेही त्यांनी सांगितले.


...तर आयुक्तांच्या दालनाबाहेर कचरा!

"हा कचरा जर गुरुवारी उचलला गेला नाही, तर उद्रेक झालेला पहिला नगरसेवक मीच असेन," असे सांगत सातमकरांनी 'हा सर्व कचरा गाड्यांमध्ये भरून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आणू टाकू' असा इशारा दिला. यावर संजय घाडी, आशिष चेंबूरकर, आसिफ झकेरिया, प्रभाकर शिंदे,मनोज कोटक यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

यापूर्वी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी 'कचरा उचलणे बंद झाले, तर महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आणू टाकू', असा इशारा दिला होता. आता भाजपाच्या मार्गावरच शिवसेनाही चालू लागली असून लोकांचा उद्रेक होण्यापूर्वी कोणत्या पक्षाचा नगरसेवक पुढाकार घेऊन महापालिका आयुक्त किंवा सहायक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर कचरा आणून टाकतो, हेच आता पहायचे आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा