Advertisement

मार्केटमधील गाळेधारकांच्या परवाना शुल्कात दुपटीने वाढ


मार्केटमधील गाळेधारकांच्या परवाना शुल्कात दुपटीने वाढ
SHARES

फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात येणारा माल सोडवताना वसूल करण्यात येणारे शुल्क आणि त्यावर आकारण्यात येणारा दंड यांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली. असे असतानाच आता मंडईंमध्ये (मार्केट) व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या शुल्कातही दुपटीने वाढ करण्यात येत आहे. सध्या आकारण्यात येणारे वार्षिक शुल्कासह परवाना शुल्कातही डबल वाढ करण्यात येत असून याबाबतचा प्रस्तावच प्रशासनाने विधी समितीपुढे मंजुरीसाठी आणला आहे.

मुंबईमध्ये महापालिकेच्या सुमारे ९१ मंडई असून यासर्व मंडईंपैकी काही मंडया मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे काहींचा पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे, तर पुनर्विकासाअभावी अनेक मंडयांची दुरुस्ती रखडली आहे. काही मंडयांची केवळ डागडुजी करण्यात येत आहे. मात्र, महापालिकेच्या अनेक मंडया या धोकादायक असून त्यामध्ये गाळेधारक तसेच विक्रेते भीतीच्या सावटाखाली व्यवसाय करत आहे. मात्र, आता त्या मंड्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या वार्षिक परवाना शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे.


परवाना शुल्क वाढणार

मुंबई महापालिकेने सन २००० पासून ते २०१७पर्यंत अर्थात १६ वर्षात मंडयांमधील विक्रेत्यांच्या परवाना शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. परंतु, आता महागाईचा दर वाढला आहे. महापालिका मंडयांच्या माध्यमातून जनतेला चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीपुढे मंजुरीला आला असून स्थायी समिती आणि महापालिकेच्या मान्यतेनंतर याची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे बाजार विभागाचने स्पष्ट केले आहे.


बर्फात मासे ठेवायचे तर वर्षाला ३ हजार मोजा

मंडईंमध्ये मासे विक्रेत्या कोळी भगिनी तसेच मटण विक्रेत्यांच्या शुल्कातही दुपटीने वाढ केलेली आहे. ताजे मांस मटण आणि मासळीसाठी सध्या आकारण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या तुलनेत आता प्रतिवर्षी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय बर्फात गोठवलेलया मांस, मटण आणि माशांसाठीचे परवाना शुल्क आता तीन हजार रुपये एवढे करण्यात आले आहे. कोणतीही वस्तू विकण्यासाठी किंवा प्रदर्शित करून विकण्यासाठी वार्षिक सेवा शुल्क हे सध्या २०० रुपये आकारले जाते, त्यात वाढ करून ते आता ४०० रुपये केले जाणार आहे. यासाठीच परवाना शुल्क हे दीड हजार रुपयांच्या तुलनेत तीन हजार रुपये एवढे केले जाणार आहे.


मुंबई महापालिकेने परवाना शुल्कात जरुर वाढ करावी, परंतु, आधी मार्केटमध्ये सेवा-सुविधा उपलब्ध करून द्यावी. आजही अनेक मंडया विकासकाच्या ताब्यातून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर काही मंडया महापालिकेच्या ताब्यातही आल्यात. परंतु, या मंडयांची योग्य प्रकारे देखभाल न झाल्यामुळे त्या धोकादायक बनत चालल्यात. त्यामुळे या सर्व मंडयांची दुरुस्ती केली जावी. जेणे करून विक्रेत्यांना भीतीच्या सावटाखाली न बसता त्या ठिकाणी बिनधास्तपणे व्यवसाय करता येईल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा या मंडयींना भेट देऊन त्या ठिकाणी गाळेधारक कोणत्या परिस्थितीत राहतात याची माहिती घ्यावी.
- सुदर्शन मंडलिक, गाळेधारक, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई


हेही वाचा - 

प्रकल्पबाधित गाळेधारकांना मिळणार हवे तिथे गाळे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा