Advertisement

फेरीवाल्यांचं पुनर्वसन पुढच्याच आठवड्यात,१५ ऑक्टोबरपर्यंत ‘डोमिसाईल’ सादर करण्यास मुदतवाढ

पुढील आठवड्यात ३ प्रभगांमधील फेरीवाला क्षेत्रातील रस्त्यांवर पात्र फेरीवाल्यांचं अधिकृत बस्तान बसवलं जाणार आहे. महापालिकेच्या वरळी, दादर-माहीम आणि बोरीवली आदी भागांमधील रस्ते निश्चित झाले आहेत. या रस्त्यांवर पात्र फेरीवाल्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे.

फेरीवाल्यांचं पुनर्वसन पुढच्याच आठवड्यात,१५ ऑक्टोबरपर्यंत ‘डोमिसाईल’ सादर करण्यास मुदतवाढ
SHARES

मुंबई फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शेवटच्या टप्प्यात असून पुढील आठवड्यात ३ प्रभगांमधील फेरीवाला क्षेत्रातील रस्त्यांवर पात्र फेरीवाल्यांचं अधिकृत बस्तान बसवलं जाणार आहे. महापालिकेच्या वरळी, दादर-माहीम आणि बोरीवली आदी भागांमधील रस्ते निश्चित झाले आहेत. या रस्त्यांवर पात्र फेरीवाल्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. दरम्यान, सर्व फेरीवाल्यांना पात्रतेसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट) आवश्यक असून ते सादर करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.


पुरावे सादर करण्याच्या सूचना

मुंबईमध्ये फेरीवाला धोरणाची अंमबजावणी करण्यासाठी २०१४ मध्ये येथील सर्व फेरीवाले व पथविक्रेता यांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये महापालिकेकडे एकूण ९९ हजार ४३७ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर महापालिकेने अर्जदारांना ‘रजिस्टर एडी’द्वारे दिलेल्या पत्त्यावर पत्रं पाठवून पुरावे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत सर्वाँना पुराव्यांसहित अधिवास प्रमापणपत्र सादर करण्यास सांगितलं होतं. परंतु अनेकांना हे प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब लागत असल्यामुळे ही मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली.


७ ते ८ हजार फेरीवाले पात्र

महापालिकेकडे आतापर्यंत पडताळणी झालेल्या अर्जांपैकी ७ ते ८ हजार पात्र ठरलेले आहेत. याशिवाय १५ हजार फेरीवाले हे परवानाधारक आहेत. त्यामुळे सुरुवातीला या पात्र फेरीवाल्यांचं पुनर्वसन केलं जाईल. मागील ८ दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिमंडळाच्या उपायुक्तांची एक बैठक घेतली होती. यामध्ये सर्व उपायुक्तांना निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्रातील रस्त्यांवर एक बाय एकची आखणी करून तिथं पात्र फेरीवाल्यांना बसवण्याची व्यवस्था केली जावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील जी-उत्तर व जी- दक्षिण या विभागासह बोरीवली आर-मध्य विभागातील काही रस्त्यांवर या पात्र फेरीवाल्यांना बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे.


कुठे, किती फेरीवाले बसणार?

बोरीवलीतील गोराई येथील लोकमान्य टिळक रोडवर सुमारे २५० फेरीवाल्यांना बसवण्यात येणार असल्याची माहिती आर-मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर जी-दक्षिण येथील सेंच्युरी बाजार येथील हशू तांडेल रोडवर ३७ फेरीवाले बसवण्यात येणार आहे. आणि जी-दक्षिण विभाग कार्यालयाजवळील एस. एल मठकर मार्गावर महिला फेरीवाल्यांना बसवलं जात आहे. या रस्त्यांवर महिला फेरीवाल्यांना बसवण्याचा विचार असल्याचं विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.


पहिल्या टप्प्यात जागा वाटप

२ ऑक्टोबरला या फेरीवाला धोरणाची अंमबजावणी करून पात्र फेरीवाल्यांना सर्टिफिकेट देत त्यांचं पुनर्वसन देण्याची योजना होती. परंतु त्या दृष्टीकोनातून तयारी आता होत आली असून २ ऑक्टोबरला याचा शुभारंभ होणार नाही. मात्र या पहिल्या आठवड्यात पात्र फेरीवाल्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना फेरीवाला क्षेत्रातील जागेत बसवण्यात येणार आहे. यासाठीची सर्टिफिकेटची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जे पात्र फेरीवाले ठरले आहे, त्यांना पहिल्या टप्प्यात जागा वाटप केली जाईल, असं उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.

महापालिकेच्या आर-मध्य, जी-उत्तर व आर-दक्षिण या विभागातील काही रस्ते निश्चित करून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. याबाबत परिमंडळातील झोनल टाऊन व्हेडिंग कमिटीने मान्यता दिलेल्या आहेत अशा रस्त्यांवर या फेरीवाल्यांना बसवलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

प्लास्टिक बंदीतील चूक ‘फेरीवाला’त सुधारणार, नगरसेवकांना विश्वासात घेऊनच काम

फेरीवाल्यांना पुरावे सादर करण्याची नोटीस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा