Advertisement

आता रात्रीही होणार फेरीवाल्यांवर कारवाई


आता रात्रीही होणार फेरीवाल्यांवर कारवाई
SHARES

मुंबईतील अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई हाती घेणाऱ्या महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने आता फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचा फास आणखी आवळायचे ठरवले आहे. आतापर्यंत कार्यालयीन वेळेतच फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या महापालिकेने रात्री ११.३० वाजेपर्यंत मोहीम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये स्वतंत्र पथके तयार केली असून दर गुरुवारी प्रत्येक परिमंडळातील एकाच विभागात अचानकपणे मोठी कारवाई हाती घेतली जाणार आहे. झोनमधील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून ही कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.


पदपथ, रस्ते अतिक्रमणमुक्त

मुंबईतील अनेक भागांमध्ये तसेच विशेषत: रेल्वे स्टेशन जवळील परिसरात महापालिकेच्या कार्यालयीन वेळानंतर मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते किंवा फेरीवाले रात्री उशीरापर्यंत पदपथ तसेच रस्ते अडवून बसतात. अशाप्रकारच्या तक्रारी आल्यानंतर पादचाऱ्यांना व वाहन चालकांसाठी पदपथ तसेच रस्ते मोकळे करून करून देण्यासाठी अशा फेरीवाल्यांविरोधात तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई हाती घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी परिपत्रकाद्वारे जारी केले आहे.


स्वतंत्र पथके विभागात तैनात

या परिपत्रकानुसार प्रत्येक पथकात ८ कामगार-कर्मचारी असणार असून सर्व २४ पथकांमध्ये एकूण १९२ कर्मचारी कार्यरत  राहणार आहेत. या प्रत्येक पथकाला एक अतिक्रमण निर्मूलन वाहन देण्यात येणार आहे. विभागातील सहाय्यक आयुक्तांच्या (Ward Officer) सूचनेनुसार पथकातील अनुज्ञापन निरिक्षक या पथकाच्या कामाचे समन्वयन करणार असून त्यांना महापालिकेद्वारे भ्रमणध्वनी संचासह सिमकार्ड देखील देण्यात येणार आहे. अधिक सुरक्षेच्या दृष्टीने या प्रत्येक पथकासोबत पोलिस कर्मचारीही तैनात असतील, असे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी सांगितले आहे.


गुरुवारी निवडणार एकच वॉर्ड

महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार याची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी  दिले होते. महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत फेरीवाल्यांवर कारवाई होणारच असून याशिवाय दुपारी ३.३० ते ११.३० यावेळेत प्रत्येक विभागात ही कारवाई होणार आहे. तर दर गुरुवारी प्रत्येक झोनमधील सर्व पथके एकत्र करून महामोहीम त्या विभागातील एकाच विभागात घेतली जाईल, असे ढाकणे यांनी स्पष्ट केले.


गॅस सिलेंडर आढळल्यास एफआयआर

अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे गॅस सिलिंडर वा रॉकेल आढळून आल्यास त्याविरोधात पोलीस तक्रार (FIR) दाखल करण्याचीही जबाबदारी या पथकांकडे सोपविण्यात आली आहे, अशीही माहिती उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली आहे.



हे देखील वाचा -

मुंबादेवी ट्रस्ट राज्य सरकारने ताब्यात घ्यावी - राज पुरोहित



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा