Advertisement

लालबाग राजा मंडळाच्या मुजोरीला चाप; सरकारी नियंत्रण येणार

मंडळाविरोधात आलेल्या तक्रारी लक्षात घेत आता मंडळावर सरकारी नियंत्रण आणण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार आता एक समिती स्थापन करत या समितीकडून रांगेचं नियोजन करण्यात येणार आहे.

लालबाग राजा मंडळाच्या मुजोरीला चाप; सरकारी नियंत्रण येणार
SHARES

गणेशोत्सवादरम्यान लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी यंदा प्रकर्षानं दिसून आली. तर सर्वसामान्य भाविकांना कार्यकर्त्यांकडून कशी हीन वागणूक दिली जाते हेही समोर आलं. मात्र लालबाग राजा मंडळाची ही मुजोरी आणि अरेरावी आता कायमची संपणार आहे. कारण लालबाग राजा मंडळाच्या या मुजोरीची, अरेरावीची गंभीर दखल अखेर धर्मादाय आयुक्तांनी घेतली आहे.


दानाची मोजणी प्रतिनिधींसमोर

मंडळाविरोधात आलेल्या तक्रारी लक्षात घेत आता मंडळावर सरकारी नियंत्रण आणण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार आता एक समिती स्थापन करत या समितीकडून रांगेचं नियोजन करण्यात येणार आहे. तर लालबाग राजाच्या चरणी आलेल्या दानाची अर्थात रोख रक्कम आणि दागिण्यांची मोजणी धर्मादाय आयुक्तांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात येणार आहे. त्यामुळे लालबाग राजा मंडळासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.


पोलिस-कार्यकर्ते भिडले

मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनाला दरवर्षी मुंबईच्याच नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळेच वर्षागणिक लालबागच्या राजाला असलेली गर्दी वाढतच चालली आहे. असं असताना दुसरीकडे मात्र राजाच्या दर्शनाच्या वेळी गडबड, गोंधळ, वाद आणि धक्काबुक्की होताना दिसते. मंडळाचे कार्यकर्ते कशाप्रकारे भाविकांशी वागतात हे ही समोर येत अाहे. यंदा तर पोलिस आणि कार्यकर्ते भिडल्याचंही पहायला मिळालं.


सरकारी नियंत्रण 

लालबाग राज्याच्या दरबारात भाविकांना मिळणाऱ्या या वागणुकीविरोधात आणि कार्यकर्त्यांच्या मुजोरीविरोधात धर्मादाय आयुक्तांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार धर्मादाय आयुक्तांनी यासंबंधीचा आढावा घेऊन पाहणी केली. त्यानंतर मंडळावर सरकारी नियंत्रण ठेवण्याच्या निष्कर्षापर्यंत धर्मादाय आयुक्त पोहचले. तसा निर्णय धर्मादाय आयुक्तांकडून जाहीर करण्यात आला आहे.


समिती स्थापन

मंडळाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दर्शन रांगेचं धोरण ठरवणार आहे. यापुढे मंडळाला समितीच्या, धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसारच रांग सोडावी लागणार असून या धोरणातील तरतुदींचं उल्लंघन केल्यास मंडळाला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.


दर्शनाबाबत वाद

दर्शनाबाबत काहीही वाद झाला तर त्यासंबंधीचा अंतिम निर्णय हा धर्मादाय आयुक्तांचाच राहणार आहे हे विशेष. त्यामुळे रांगेत होणारा गोंधळ आणि कार्यकर्त्यांकडून होणारी मुजोरी याला आता चाप बसेल असं म्हटलं जात आहे. त्याचवेळी लालबाग राजाच्या चरणी दरवर्षी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान जमा होतं. या दानाची मोजणीही धर्मादाय आयुक्तांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात येणार आहे.हेही वाचा -

रुग्णवाहिकेअभावी प्रवाशाची ६ तास मृत्यूशी झूंज; रेल्वेच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय

गुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा