Advertisement

सेवा नाही तर कर नाही! कल्याणकारांनी थकवला ९० कोटींचा कर


सेवा नाही तर कर नाही! कल्याणकारांनी थकवला ९० कोटींचा कर
SHARES

सध्या कल्याण म्हटलं की रस्त्यांवरील खड्डे आणि खड्ड्यात पडून जाणारे बळी हेच चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर येत आहे. कल्याणमधील प्रत्येक रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य असून या खड्ड्यांनी आतापर्यंत पाच जणांचा बळी घेतला आहे. ही परिस्थिती या वर्षीची नाही तर वर्षानुवर्षे कल्याणकारांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यातही पावसाळ्यात कल्याणकारांची ही भिती आणखी वाढत आहे.


नागरीक संघटना आक्रमक

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मात्र या परिस्थितीवर मात्र करताना कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप करत कल्याणमधील जागरूक नागरीक संघटना आता आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या माध्यमातून कल्याणकारांनी सेवा नाही तर कर नाही अशी आक्रमक भूमिका घेत पालिकेचे कोणतेही कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात ९० कोटींचा कर नागरिकांनी भरला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर यापुढंही कर भरणार नाही, पालिकेला जे करायचं ते करावं, आधी सेवा द्या मगच कर भरू अशी भूमिका कल्याणकारांची असल्याची माहिती जागरूक नागरीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी दिली आहे.


सुविधांची वानवा

कल्याणमध्ये खड्ड्यांचा, पेव्हर ब्लाॅकचा प्रश्न तर गंभीर आहेच. पण पालिकेकडून स्वच्छतेसह अन्यही आवश्यक त्या सुविधा योग्य प्रकारे पुरवल्या जात नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळेच गेल्या वर्षीच या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नागरिकांनी पालिकेच्या मालमत्ता करासारखे कोणतेही कर भरणार नसल्याचा इशारा पालिकेला दिला. तर वर्षभरात अनेक नागरिकांनाही हा इशारा खरा करून दाखवला आहे. त्यामुळेच वर्षभरात कल्याणकारांनी ९० कोटी रूपयांचा कर भरला नसल्याचं घाणेकर यांनी सांगितलं आहे.


कर न भरण्याचं अावाहन

कित्येक कल्याणकरांनी इतकी आक्रमक भूमिका घेऊन, कर न भरल्याने कल्याणमध्ये नागरी सेवांची वानवा आहे. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं कल्याणमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण केली आहे. तर याच खड्ड्यांनी पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सध्या कल्याणमध्ये खड्ड्यांचा प्रश्न एेरणीवर आला असून कल्याणकरांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 

पालिकेकडे पाठपुरावा करूनही खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे असल्यानं कल्याणकर रस्त्यावर उतरून पालिकेचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करत आहेत. त्याचाच भाग म्हणून संघटनेनं सेवा नाही तर कर नाही हे आंदोलन आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करत कर भरू नका असं आवाहन नागरिकांना केलं जाणार असल्याचं घाणेकर यांनी सांगितलं आहे.


न्यायालयात खेचले तरी कर नाही

गेल्या वर्षी सेवा नाही तर कर नाही या मोहिमेंतर्गत ९० कोटींचा कर वसुल झालेला नाही. तर यंदाही आम्ही कर भरणार नाही. मग पालिका आमच्या दाराशी येऊन कराची रक्कम मागो वा आम्हाला न्यायालयात खेचो. आम्ही कर भरणार नाही. जोपर्यंत पालिकेकडून आम्हाला आवश्यक त्या सुविधा योग्य प्रकारे पुरवल्या जात नाहीत तोपर्यंत कर भरणार नाही, अशी प्रतिक्रिया घाणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता खड्डे आणि कर न भरण्याचा मुद्दा कल्याणमध्ये एेरणीवर येणार असंच चित्र आहे.



हेही वाचा -

मुंबईकरांनो, आज जरा जास्तीचंच दूध खरेदी करा...

खड्ड्यात जावो जनता, आम्हाला नाही चिंता



 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा