Advertisement

लवकरच सुरू होणार राज्यातील जीम, मुख्यमंत्र्यांचे संकेत

जीमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी जीम मालकांनी सरकारला सर्वात आधी मार्गदर्शक तत्वे बनवून ती सादर करावीत. त्याआधारे जीम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

लवकरच सुरू होणार राज्यातील जीम, मुख्यमंत्र्यांचे संकेत
SHARES

राज्यातील जीम सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. जीमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी जीम मालकांनी सरकारला सर्वात आधी मार्गदर्शक तत्वे बनवून ती सादर करावीत. त्याआधारे जीम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

मुंबईतील जीम चालकांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, इतर व्यवसायाप्रमाणेच जीम व्यवसाय देखील सुरू झाला पाहिजे, असं सरकारला वाटतं. सध्याच्या घडीला सर्वांनीच व्यायाम करून शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे, जेणेकरून कोरोना विषाणूचा मुकाबला करण्याठी शरीर तंदुरूस्त असेल. पण त्याचसोबत जीम सुरु करताना कोरोनाचा प्रसार रोखणं हे देखील मोठं आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जीम चालकांनी एकत्र येऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे बनवणं आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जीम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनाला सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानेही केली जीम सुरू करण्याची मागणी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजूनही जीम आणि फिटनेस क्लब सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे मागील ५ महिन्यांपासून हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याने जीम तसंच फिटनेस क्लब सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने होऊ लागली आहे. 

जीम चालकांच्या निवेदनानंतर आता अनलॉक ची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणं आवश्यक आहे. राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जीम चालकांच्या मागणीला पाठिंबा दिला होता.

तर जीम मालक-चालकांनी काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन  त्यांच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. त्यावेळेस राज ठाकरे यांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करून जीम उघडा, पुढं काय होईल ते बघून घेऊ, असा दिलासा जीम व्यावसायिकांना दिला होता. तर विधनसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जीम सुरू करण्याची मागणी केली होती. 

हेही वाचा- Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा