Advertisement

Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे

मागील ४ महिन्यांपासून मोठं नुकसान सहन करत असलेल्या जीम चालक, मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत लाॅकडाऊन शिथिल करत उद्योगधंदे सुरू करायला परवानगी दिली असली, तरी अद्याप जीम सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे मागील ४ महिन्यांपासून मोठं नुकसान सहन करत असलेल्या जीम चालक, मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवार ११ आॅगस्ट २०२० रोजी कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचं, सर्व नियमांचं पालन करून व्यायामशाळा सुरू करा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरातील व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊनमुळे अर्थचक्राचं रुतलेलं गाडं पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी मे महिन्यापासून लाॅकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात झाली. अटी-शर्थींचं पालन करून अनेक उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली. केंद्र सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या नियमावलीत जीम व व्यायामशाळाही खुल्या करण्याची परवानगीही दिली. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला होता. त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रातील इनडोअर जीम बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं राज्यभरातील ४ हजारांहून जास्त जीम बंद असल्याने जीम चालक, मालक, प्रशिक्षकांपुढं आर्थिक प्रश्नही उभा राहिला आहे.

हेही वाचा - वाढीव वीज बिलामुळे मनसे आक्रमक, नवी मुंबईतील महवितरणाचं कार्यालय फोडलं

या सर्व पार्श्वभूमीवर जीम चालक, मालकांनी मंगळवारी दुपारी राज ठाकरे यांची भेट घेऊन याप्रश्नी मध्यस्ती करण्याची विनंती केली. त्यावर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचं, सर्व नियमांचे पालन करून व्यायामशाळा सुरू करा. लोकांची काळजी घ्या. गेले चार महिने आपण ज्यातून गेलो ते आणखी पसरणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन जीम व्यावसायिकांना केलं. यासंदर्भात आपण विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा केली असून ते देखील या विषयांत लक्ष घालतील, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

बाजार सुरु आहेत. सगळीकडे सगळया गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगतं सुरु करा, राज्य सुरु करायला तयार नाही. केंद्र सरकारनं जीम आणि विमानतळ सुरू करायला सांगितलं आहे. राज्य नकार देत आहे. राज्य सरकारला काही वेगळी अक्कल आहे का? असा संतापही राज यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा