Advertisement

अपंग डब्यात चढलेल्या गर्भवती महिलेच्या पोटातच मारल्या लाथा


अपंग डब्यात चढलेल्या गर्भवती महिलेच्या पोटातच मारल्या लाथा
SHARES

अपंगांसाठी राखीव असलेल्या लोकलच्या डब्यात एका गर्भवती महिलेला मारहाण झाल्याची घटना बुधवारी घाटकोपर स्थानकाजवळ घडली. अपंगाचे कार्ड विचारत दोन प्रवाशांनी तिच्या पोटात लाथा देखील मारल्या.

हा सर्व प्रकार समजताच इतर प्रवाशांनी त्या दोघांना जाब विचारला. पण, तितक्यातच मारहाण करणाऱ्या दोघांनी चालत्या ट्रेनमधूनच प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी आरोपींविरोधात फक्त अदखलपात्रचा गुन्हा नोंदवला आहे.

विठ्ठलवाडी परिसरात राहणारे दिनेश तिवारी यांची पत्नी 8 महिन्यांची गर्भवती असून ते 3 दिवसांपूर्वी तपासणीसाठी तिला कामा रुग्णालयात घेऊन गेले होते. बुधवारी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिवारी हे पत्नीला घेऊन सीएसटीएम स्थानकातून संध्याकाळी 7.01 च्या कर्जत लोकलने घरी जायला निघाले. पण, कुर्ला स्थानकातून अपंगाच्या डब्यात चढलेल्या दोघा धडधाकट प्रवाशांनी तिवारी यांच्या पत्नीला डब्यात पाहून तिच्याकडे अपंग असल्याचे कार्ड दाखवण्यास सांगितले. आपण गर्भवती असल्याचं सांगताच या दोघांनी तिला अर्वाच्य शिवीगाळ केली. यावेळी दिनेश यांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही खूप मारहाण केली. ते पाहून आपल्या पतीला वाचवण्यासाठी गर्भवती महिलेने मध्यस्थी केल्याने त्या दोघांनी तिच्या पोटावर लाथा मारल्या.

या सगळ्या प्रकारानंतर तिवारी यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून लोहमार्ग ठाणे गाठले. तेथील पोलिसांनी या दाम्पत्याला अनेक तास बसवून ठेवत त्यांची तक्रार घेऊन फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला. तसेच गुन्हा नोंदवायचा असेल तर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला या दाम्पत्याला दिला. दरम्यान, हा प्रकार कुर्ला येथे झाल्याने कुर्ला जीआरपी याप्रकरणाचा तपास करणार असल्याचं डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

लोकलमध्ये प्रवाशांना मारहाण करणाऱ्या महिला टोळीला अटक

डिस्चार्जला उशीर झाला म्हणून त्याने केली नर्सला मारहाण


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा