Advertisement

उद्यानांच्या देखभाल कंत्राटात कंत्राटदारांची मिलिभगत, महापालिकेलाच फसवले!

कंत्राट कामांमध्ये एका कंत्राटदाराला एकच काम देण्याची स्पष्ट अट असल्यामुळे सर्व कंत्राटदारांनी संगनमत करून या निविदेत भाग घेत कंत्राट मिळवले आहे. वैभव आणि कपूर ट्रेंडिंग या कंपन्या एकाच मालकाच्या असून त्या दोन्ही कंपन्यांनी कामे मिळवताना महापालिकेची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.

उद्यानांच्या देखभाल कंत्राटात कंत्राटदारांची मिलिभगत, महापालिकेलाच फसवले!
SHARES

मुंबईतील तब्बल ३२१ उद्यानांच्या देखभालीचे कंत्राट संपुष्ठात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्ष या उद्यान व मैदानांची देखभाल करण्यासाठी देण्यात येणाऱ्या या कंत्राटात अंदजित रकमेच्या १० ते ३५ टक्के कमी दराने बोली लावत कंत्राटदारांने कामे मिळवली आहे. परंतु, ही कामे मिळवताना कंत्राटदारांनी संगनमत करून कंत्राटं मिळवली आहेत. वैभव आणि कपूर ट्रेंडिंग या कंपन्या एकाच मालकाच्या असून त्या दोन्ही कंपन्यांनी कामे मिळवताना महापालिकेची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.


३२१ मैदानांसाठी कंत्राटदारांची निवड

मुंबईतील २४ प्रभागांमधील उद्याने, मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे तसेच उड्डाणपुलाखालील जागा आदींचा विकास करून त्यांच्या देखभालीसाठी एप्रिल २०१४मध्ये विभागवार कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. यानुसार ३२१ भूभागांचा विकास करून देखभाल करण्यासाठी जे कंत्राटदार नेमण्यात आले होते, त्यांचे कंत्राट ३१ ऑगस्ट २०१७ला संपुष्टात आले. त्यामुळे या ३२१ उद्यान व मैदानांच्या देखभालीसाठी पुन्हा नव्याने कंत्राटदारांची निवड करण्यात आली.


देखभालीसाठी ७६.३५ कोटींचा खर्च

उद्यानांच्या विकासासह त्यामध्ये हिरवळ, रोपांची लागवड, लहान मुलांची खेळाची साधने, पदपथ, जॉगिंग ट्रॅक, व्यायामाची साधने, संरक्षक भिंत यासारखी कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात येणार आहेत. शिवाय मैदान, उद्यान आणि रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे आदी ठिकाणी स्वच्छता, साफसफाई, सुरक्षा रक्षक, पाण्याची सोय आदी देखभालीच्या कामांचाही समावेश आहे. त्यामुळे डी विभाग वगळता अन्य २३ प्रभागांमधील उद्यान व मैदांनाचा विकास व देखभालीसाठी २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुढील अडीच वर्षांसाठी ७६.३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.


कंत्राटदार एक, निविदा अनेक!

या सर्व कंत्राट कामांमध्ये एका कंत्राटदाराला एकच काम देण्याची स्पष्ट अट असल्यामुळे सर्व कंत्राटदारांनी संगनमत करून या निविदेत भाग घेत कंत्राट मिळवले आहे. एम पूर्व विभागात फेरनिविदा काढण्यात आली होती. पण प्रथम काढलेल्या निविदेत राजदीप या कंपनीने ३१ टक्के कमी दराने बोली लावली होती. परंतु, ही निविदा बाद करत नव्याने निविदा मागवल्यानंतर याच एम पूर्वमध्ये वैभव एंटरप्रायझेस या कंपनीने १३ टक्के कमी बोली लावून काम मिळवले.


कंत्राटदारानं पालिकेला फसवलं

विशेष म्हणजे वैभव एंटरप्रायझेस आणि राजदीप या संलग्न कंपन्या असून पहिल्या निविदेत राजदीपने ३१ टक्के कमीची बोली लावली आणि त्यांचीच कंपनी असलेल्या वैभव एंटरप्रायझेसने १३ टक्के कमी बोली लावून काम मिळवले. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्याशी बोलणी करून त्यांना ३१ टक्के कमी दराने काम करण्यास भाग पाडायला हवे होते. परंतु, तसे न करता एकाच मालकाच्या दोन कंपन्यांना आपली चूक सुधारुन महापालिकेची तिजोरी लुटण्याचा मार्ग खुला केला आहे.

कपूर ट्रेंडिग, वैभव एंटरप्रायझेस या दोन्ही कंपन्यांचे कागदोपत्री मालक एकच असताना, त्यांना ए विभाग व एम पूर्व विभागाची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे स्थायी समितीत अत्यंत घाईघाईत हा प्रस्ताव आणून तो मंजूर करण्याचा घाट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घातला होता. परंतु, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला आक्षेप घेतल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांवर हा प्रस्ताव राखून ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे येणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून वादळ उठण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मैदाने लाटणाऱ्या शिवसेनेने 'स्वेट ऑन स्ट्रीट'च्या माध्यमातून मुलांना रस्त्यांवर खेळवले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा