Advertisement

'टीबी' घेतोय रोज 18 मुंबईकरांचा जीव


'टीबी' घेतोय रोज 18 मुंबईकरांचा जीव
SHARES

मुंबईकरांभोवती क्षयरोगा (टीबी)चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून दररोज 18 मुंबईकरांचा जीव क्षयरोग घेत असल्याचे धक्कादायक वास्तव 'प्रजा फाऊंडेशन'ने सादर केलेल्या 'हेल्थ रिपोर्ट'मधून पुढे आले आहे.

दरवर्षी 'प्रजा फाऊंडेशन' माहितीच्या आधारे मिळवलेल्या आकडेवारीवर आधारीत मुंबईचा 'हेल्थ रिपोर्ट' सादर करते. यंदाच्या 'हेल्थ रिपोर्ट'मधून महानगरपालिका आणि राज्य शासन डेंग्यू, क्षयरोग तसेच अन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यात कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


असे आहे वास्तव :

  • 2012 मध्ये क्षयरोगाचे 36,417 रुग्ण
  • 2015 -16 मध्ये क्षयरोगाने 5,400 रुग्णांचा मृत्यू
  • 2016-17 मध्ये 50,001 रुग्ण. त्यापैकी 6,472 जणांचा मृत्यू
  • 2016-17 मधील आकडेवारीनुसार दररोज 18 जणांचा क्षयरोगामुळे मृत्यू
  • गेल्या 5 वर्षांत अंदाजेे 32,862 रुग्णांचा मृत्यू


'डॉट्स'कडे टीबीच्या रुग्णांची पाठ

सरकार क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. 'डॉट्स' उपक्रमांतर्गत सरकारकडून क्षयरोगाच्या रुग्णांची मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी मोफत उपचार केले जातात. सातत्याने जनजागृतीही केली जाते. तरीही रुग्ण सरकारच्या 'डॉट्स' उपक्रमाकडे पाठ फिरवत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

सन 2012 मध्ये 'डॉट्स' उपक्रमांतर्गत 30 हजार 828 रुग्णांनी उपचार घेतले होते. ही संख्या 2016 मध्ये 15 हजार 767 म्हणजेच निम्म्यावर आली.


नगरसेवक उदासीन

क्षयरोगाबाबत नगरसेवकांमध्येही उदासीनता असल्याचे 'प्रजा'चे म्हणणे आहे. माहिती अधिकारात उघड झालेल्या आकडेवारीनुसार, 'डॉट्स' उपक्रमांतर्गत क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दरवर्षी 10 टक्क्यांनी घट होत आहे.


दररोज 18 मुंबईकरांचा टीबीने मृत्यू होणे ही एक गंभीर बाब आहे. आम्ही ही माहिती आता सरकारपुढे मांडणार आहोत. जेणेकरून, सरकार याबाबत ठोस पावले उचलू शकेल. मुंबईत वाढणाऱ्या आजारांकडे मुंबईतील प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. महापालिकेने नकारात्मक भूमिकेतून बाहेर येऊन आरोग्याच्या प्रश्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चांगले, निरोगी शहर घडवण्यासाठी आरोग्यासंदर्भातील जी आव्हाने आहेत ती स्वीकारुन पाऊले उचलली पाहिजेत.
मिलिंद म्हस्के, संचालक, प्रजा फाऊंडेशन


सर्वाधिक टीबीचे रुग्ण कुठे ?

  • एल वॉर्डमधील कुर्ला परिसरात 1 हजार 254 रुग्ण
  • एच पूर्व वॉर्डमधील सांताक्रूझ विभागात 659 रुग्ण
  • आर/ दक्षिण वॉर्डमधील कांदिवलीत 493 रुग्ण


डेंग्यूचीही दहशत : रुग्णांमध्ये 265 टक्क्यांनी वाढ



गेल्या 5 वर्षांत मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्येही जवळपास 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
'प्रजा फाऊंडेशन'ने यावर्षी आपल्या अहवालात डेंग्यू आणि टीबी या दोन आजारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूचे तब्बल 17,771 रुग्ण आढळून आले आहेत. 2012 -13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण आढळले होते. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्य रुग्णांची संख्या 77 वरुन 148 वर पोहोचली आहे.


डायबिटीज आणि हायपरटेन्शनही वाढतंय...

बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीज आणि हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये डायबिटीजमुळे 2 हजार 675 जणांचा मृत्यू झाला, तर हायपरटेन्शनमुळे तब्बल 4 हजार 438 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.


हे आहे वास्तव :

  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता
  • केवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत
  • मुंबईतील 71% कुटुंबांकडे मेडिकल इन्श्युरन्स नाही


तुटपुंजा निधी

आशियात सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासाठीचे बजेट केवळ 3 हजार 312 कोटी रुपयांचे आहे. यातुलनेत मुंबईहून लहान असणाऱ्या ठाणे महापालिकेचा आरोग्य विभागाचे बजेट 3 हजार 390 कोटी रुपयांचे आहे.


पालिका सभागृहातही अनास्था

मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी केवळ 68 प्रश्न रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांची नाव बदलण्यासाठी विचारल्याचे समोर आले आहे. तर, फक्त 45 प्रश्न हे आरोग्यावर विचारण्यात आले असल्याची खंत प्रजा फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद मस्के यांनी व्यक्त केली आहे.



हे देखील वाचा -

मुंबईकरांचा पावसाळा आजारात जाणार, डेंग्यु-मलेरियाच्या अळ्या झाल्या दुप्पट!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा