Advertisement

चुका झाल्या असतील, तर कबूल करा, ऊर्जामंत्र्यांनी टाटाला खडसावलं

चुका झाल्या असतील, तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा, अशा शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवरला खडसावलं.

चुका झाल्या असतील, तर कबूल करा, ऊर्जामंत्र्यांनी टाटाला खडसावलं
SHARES

मुंबईला बाहेरून होणारा वीज पुरवठा बंद झाल्यावर अतिरिक्त वीज पुरवठा करणं ही टाटा पाॅवरची जबाबदारी असताना चुका लपवल्या जात आहेत का? चुका झाल्या असतील, तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा, अशा शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवरला खडसावलं.

मुंबई, नवी मुंबईसह ठाणे क्षेत्रात वीज पुरवठा खंडित होण्याची घटना १२ ऑक्टोबरला घडली. त्यावेळी मुंबईची आयलँडिंग यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याने रेल्वेसह अत्यावश्यक सेवेचा वीजपुरवठाही काही कालावधीसाठी बंद झाला होता. या घटनेची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राला (एसएलडीसी) भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. (energy minister nitin raut blames tata power for power failure in mumbai and MMR region)  

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन ४०० केव्ही लाईन बंद पडल्याने आणि चौथी लाईन अतिरिक्त भार आल्यामुळे बंद करावी लागली तसंच त्याचवेळी आयलँडिंग यंत्रणा सुरू होणं अपेक्षित असताना ती सुरू न झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. भार प्रेषणामध्ये एसएलडीसीची मोलाची भूमिका असते. त्याअनुषंगाने त्या दिवशीचा घटनाक्रम आणि एसएलडीसीचं कामकाज कसं चालते याची माहिती घेण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी ही भेट दिली. यावेळी टाटा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबईची आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे आणि १२ ऑक्टोबर रोजी काय घडलं याचं सादरीकरण केलं.

हेही वाचा - मुंबईतील वीजपुरवठा खंडीत प्रकरण; चौकशीसाठी तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली

मुंबईला बाहेरून सुरळीत वीजपुरवठा करणं आणि बाहेरुन होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करण्यासाठी आयलँडिंग यंत्रणा सुरळीत ठेवणं आवश्यक असताना ती सुरू होऊ शकली नाही. या बाबीतील त्रुटी शोधून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे. त्यांच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असं डॉ.नितीन राऊत यांनी सांगितलं.

मुंबईतील वीज निर्मितीतूनच मुंबईला वीज पुरवठा करणं ही आयलँडिंग यंत्रणा मुंबईत कार्यान्वित आहे. १२ ऑक्टोबरच्या घटनेत टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील वीज केंद्रातील संच सुरू होऊ न शकल्याने ही यंत्रणा अयशस्वी झाली. टाटा पॉवरने देखील हे मान्य करीत आयलँडिंग यंत्रणाच पूर्णपणे बदलण्याची गरज वीज नियामक आयोगाच्या सुनावणीत व्यक्त केली. यासाठी पश्चिम क्षेत्रीय वीज समिती व आयआयटी मुंबईची मदत घेऊ, असं टाटा पॉवरने स्पष्ट केलं आहे.

यावेळी बैठकीला ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा