या रुग्णालयांमधून अँजिओप्लास्टी करताय? मग सेकंड हॅण्ड कॅथेटरपासून सावधान!

  Mumbai
  या रुग्णालयांमधून अँजिओप्लास्टी करताय? मग सेकंड हॅण्ड कॅथेटरपासून सावधान!
  मुंबई  -  

  अँजिओप्लास्टीसाठी जुन्या आणि वापरण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांचा वापर रुग्णालयांकडून केला जात असल्याची धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून नुकतीच उघड झाली आहे. अँजिओप्लास्टीसाठी जुन्या सेकेंडहॅन्ड बलुन कॅथेटर आणि गायडिंग कॅथेटरचा वापर केला जात आहे. एकीकडे रुग्णालयांकडून कॅथेटरचा पुनर्वापर तर केला जातोच आहे, पण त्याचवेळी कॅथेटरची किंमतही पुरेपुर वसूल केली जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या तीन नावाजलेल्या रुग्णालयांमध्ये हा गोरखधंदा बिनदिक्कतपणे सुरू होता. या तिन्ही रुग्णालयांना अखेर एफडीएने दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. या रुग्णालयांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

  सेकेंडहॅन्ड कॅथेटरचा वापर केला जात असून या कॅथेटरची पूर्ण रक्कम रुग्णांकडून वसूल करत रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. सेकेंडहॅन्ड कॅथेटरमुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे एफडीएने गेल्या पंधरा दिवसांत चार रुग्णालयांची कसून तपासणी केली असता तीन रुग्णालयांमध्ये वापरलेले कॅथेटर पुन्हा वापरले जात असून त्याची किंमत मात्र पूर्णपणे वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंदाजे 9 हजार रुपये अशी कॅथेटरची मूळ किंमत असताना रुग्णांकडून यासाठी 25 हजारापर्यंत रक्कम उकळली जात आहे. त्यातच आता याच कॅथेटरचा पुनर्वापर करत दुसऱ्या रुग्णांकडून 20 हजारापर्यंतची रक्कम उकळत रुग्णालये नफा कमवत असल्याचेही उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे कॅथेटरच्या खरेदी-विक्रीची योग्य माहितीही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.

  मुंबईतील नामांकित फोर्टीज-मुलुंड, हिरानंदानी हेल्थ केअर-वाशी आणि बीएसईएस-अंधेरी या तीन रुग्णालयांमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. फोर्टीजने 45 रुग्णांवर 66 कॅथेटरचा तर हिरानंदानीने 27 रुग्णांवर 44 कॅथेटरचा पुनर्वापर करत अँजिओप्लास्टी केल्याचे एफडीएच्या चौकशीतून समोर आले आहे. रुग्णालयाला नोटिसा पाठवण्यात आल्या असून रुग्णालयाचे उत्तर आल्यानंतर त्यावर सुनावणी होईल. त्यात रुग्णालय दोषी ठरल्यास रुग्णालयाविरोधात खटला दाखल करण्यात येईल, असे यावेळी डॉ. कांबळे यांनी सांगितले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.