Advertisement

वाहन जप्तीतून गुटखा तस्करांना दणका


वाहन जप्तीतून गुटखा तस्करांना दणका
SHARES

राज्यात गुटखा बंदी असताना गुटख्याची तस्करी आणि छुप्या पद्धतीने विक्री मुंबईसह राज्यभरात जोरात सुरू आहे. गुटख्याची जप्ती आणि खटले दाखल करूनही गुटखा तस्करांवर आळा बसत नसल्याने आता अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)ने ज्या वाहनांमधून गुटखा आणला जातो, ते वाहन जप्त करण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरात मुंबईसह राज्यभरातून गुटखा वाहून नेणाऱ्या 41 गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली आहे.

गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीच्या उत्पादन-विक्रीवर राज्यात बंदी आहे. पण बाहेरच्या राज्यातून विशेषत: गुजरात आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने गुटखा मुंबईत आणून विकला जात आहे. पण आता गुटखा तस्करी आणि विक्री रोखण्याचे आव्हान एफडीएसमोर आहे. गुटखा तस्करीविरोधात एफडीएची दैनंदिन मोहीम सुरूच असून वर्षभरात एफडीएने अंदाजे 30 कोटींचा गुटखा जप्त करत आरोपींविरोधात खटले दाखल केले आहेत. एप्रिलमध्ये एफडीएने एक पत्रक काढत गुटखा ज्या वाहनांतून, ट्रक, टेम्पोतून आणला जातो ती वाहनेही जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारवाई करत महिन्याभरात मुंबईतील 4, पुण्यातील 7 वाहनांसह राज्यभरातून एकूण 41 वाहने जप्त केली आहेत. यात ट्रक आणि टेम्पोसारख्या वाहनांचा समावेश असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.

हे देखील वाचा - तंबाखू टाळा...आरोग्य सुधारा

वाहनमालकांना दणका बसावा आणि त्यांनी अशा बेकायदा कामासाठी आपले वाहन देऊ नये या हेतूने ही कारवाई करण्यात येत आहे. कायदेशीर कारवाई नंतरच वाहनमालकाला त्याचे वाहन न्यायालयातून परत घेता येईल. तसेच हे वाहन यापुढे अशा कोणत्याही बेकायदा कामासाठी वापरले जाणार नाही याची हमीही वाहनमालकाला द्यावी लागणार आहे. या कारवाईमुळे नक्कीच वाहनमालकांना दणका बसणार असून ते आपले वाहन गुटखा तस्करीसाठी देण्यास धजावणार नाहीत असा विश्वास एफडीएकडून व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा - दहीसर चेकनाक्यावर पकडला लाखोंचा गुटखा

अबब...गुटखा बंदीपासून आतापर्यंत 106 कोटी 92 लाखांचा गुटखा जप्त

राज्यात 2012 पासून गुटखा बंदी लागू झाली आहे. या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यभरातून जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचा आकडा नक्कीच डोळे पांढरे करणारा आहे. गुटखा बंदीची कडक अंमलबजावणी करूनही राज्यात गुटखा बंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 106 कोटी 92 लाखांचा गुटखा पकडण्यात आला आहे. परराज्यातून येणाऱ्या गुटख्याच्या तस्करीवर लगाम आणण्याचा प्रयत्न एफडीएकडून सुरू आहे, पण ज्या राज्यातून वा ज्या रेल्वे मार्गाने हा गुटखा येतो त्या राज्याची तसेच रेल्वेची म्हणावी तशी मदत होत नसल्याने गुटखा तस्करांचे फावत असल्याचे एफडीएतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा - पान मसाला, गुटखा बंदीची ऐशी-तैशी, मुंबई लाइव्हने केला पर्दाफाश

हे देखील वाचा - 'मुंबई लाइव्ह'च्या गुटखा स्टिंग ऑपरेशननंतर एफडीएची कारवाई


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा