Advertisement

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला एफडीएही, १ लाख रुग्णांसाठी पाठवणार औषधं

केरळमधील आरोग्य यंत्रणांना पुराचा फटका बसला असून औषधांचा तुटवडाही निर्माण झाला आहे. अशावेळी केरळच्या मदतीला धावून आलं आहे ते महाराष्ट्र एफडीए.

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला एफडीएही, १ लाख रुग्णांसाठी पाठवणार औषधं
SHARES

गेल्या आठवड्यात केरळमध्ये महापूर आला, या पुरानं हाहाकार माजवला. लाखो कुटुंब बेघर झाली, ४०० हून अधिक जणांचा जीव गेला. एकूणच काय तर या पुरानं होत्याचं नव्हतं करून टाकलं. आता या पुराच्या धक्क्यातून केरळवासिय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्यासमोर सध्या मोठं आव्हान उभं आहे ते साथीच्या आजारांचं आणि इतर आजारांचं. त्यातच केरळमधील आरोग्य यंत्रणांनाही पुराचा फटका बसला असून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी केरळच्या मदतीला धावून आलं आहे ते महाराष्ट्र एफडीए.

एफडीएनं अंदाजे १ लाख रुग्णांसाठी विविध आजारांवरील औषध देणगीच्या रुपानं जमा केली आहेत. ही औषधं रविवारी, २६ आॅगस्टला सैन्याच्या विशेष विमानानं केरळला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एफडीएतील वरिष्ठ अधिकारी डी. आर. गहाणे यांनी दिली आहे.


डाॅक्टरांचं पथक केरळमध्ये

केरळवासियांना कपडे, भांडी, अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तु, पैसा याबरोबरच औषधांची आणि आरोग्य सेवेची मदत लागत आहे. त्यामुळेच केरळवासियांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी याआधीच मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ डाॅक्टरांसह पुण्यातील ससून रुग्णालयातील १० डाॅक्टरांचं पथक गेल्या आठवड्यातच केरळला रवाना झालं आहे.


औषधांची मदत

अत्यंत बिकट परिस्थितीत हे डाॅक्टर केरळमधल्या खेड्यापाड्यातील रुग्णांवर उपचार करत आहेत. हे डाॅक्टर खऱ्या अर्थानं केरळवासियांसाठी देवदुत ठरत आहेत. अशातच केरळमधील आरोग्य विभागाला औषधांची मोठी टंचाई भासत आहे.

त्यानुसार केरळ सरकारनं महाराष्ट्र सरकारकडे ५० हजार ते १ लाख रुग्णांना पुरेल इतका विविध आजारांवरील औषधांचा साठा मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं एफडीएला औषधांची व्यवस्था करण्यास सांगितलं नि एफडीएनं मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे विभागातील सहआयुक्तांना देणगी रुपानं औषध उत्पादन कंपन्यांकडून औषध जमा करण्याचे आदेश दिले. औषध कंपन्यांनीही सामाजिक दायित्व दाखवत देणगीरुपानं औषध एफडीएला दिली. वोकार्ड, एमजे बायो फार्मासारख्या अनेक कंपन्यांनी औषधं मोफत एफडीएला दिली आहेत.


औषधांचा साठा केरळला पाठवला

रक्तदाब, अँटी फंगल, मधुमेह, किडनीच्या विकारावरील औषध, हृदयविकार अशा विविध आजारांवरील १ लाख रुग्णांना पुरेल इतका औषधांचा साठा एफडीएकडे जमा झाला आहे. या औषधांच्या साठ्याची अंदाजित किंमत ४० लाख रुपये इतकी असेल. आता हा साठा रविवारी सैन्याच्या विमानानं केरळला पाठवण्यात येणार आहे.


हेही वाचा - 

'त्यांच्या'साठी मुंबईतले डॉक्टर ठरले देवदूत

केरळमधील पूरग्रस्तांना विविध संस्था, रुग्णालयांकडून मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा