Advertisement

स्विगी, झोमॅटोवरून जेवण मागवताय? मग हे वाचाच...

मोबाईलपासून जेवणापर्यंत सर्व काही आॅनलाईन मागवलं जातं. पण अनेकदा आॅनलाईन शाॅपिंगमध्ये ग्राहकांना फसवणुकीलाही बळी पडावं लागतं. अशीच फसवणूक आॅनलाईन अन्नपदार्थ पुरवणाऱ्या वेबसाईट्सकडूनही होत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे.

स्विगी, झोमॅटोवरून जेवण मागवताय? मग हे वाचाच...
SHARES

आजकाल प्रत्येक गोष्ट घरबसल्या एका क्लिकवर मागवण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे, नव्हे ही सवयच लागली आहे. अगदी मोबाईलपासून जेवणापर्यंत सर्व काही आॅनलाईन मागवलं जातं. पण अनेकदा आॅनलाईन शाॅपिंगमध्ये ग्राहकांना फसवणुकीलाही बळी पडावं लागतं. अशीच फसवणूक आॅनलाईन अन्नपदार्थ पुरवणाऱ्या वेबसाईट्सकडूनही होत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे. स्विगी, झोमॅटो, फूडपांडा आणि उबर इटसारख्या बहुचर्चीत वेबसाईट्स अन्न सुरक्षा मानके कायद्याची 'एेसी की तैशी' करत ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचंही समोर आलं आहे.


अस्वच्छ हाॅटेलांतून अन्नपुरवठा

या वेबसाईट्स अस्वच्छ हाॅटेल-रेस्टाॅरंटमधून ग्राहकांना अन्नपदार्थ पुरवतात. इतकंच नव्हे, तर विनापरवाना हाॅटेल-रेस्टाॅरंट चालवणाऱ्यांकडून अन्न पदार्थ पुरवत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. अशा ११३ विनापरवानाधारक हाॅटेल-रेस्टाॅरंटमधून या वेबसाईट्स चालवणाऱ्या कंपन्या अन्नपदार्थ पुरवत असल्याचं सिद्ध झाल्यानं या हाॅटेल-रेस्टाॅरंटचं शटर डाऊन करण्यात आल्याचंही आढाव यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चारही वेबसाईट्सविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
विशेष तपासणी मोहीम

सध्या आॅनलाईन अन्नपदार्थ मागवण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळेच अन्नपदार्थ पुरवणाऱ्या वेबसाईट्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणूनच 'एफडीए'कडून ज्याप्रमाणे 'अन्न सुरक्षा मानके कायद्या'नुसार हाॅटेल-रेस्टाॅरंट्सची तपासणी केली जाते, तशी तपासणी वेबसाईट्सला अन्नपदार्थ पुरवणाऱ्या हाॅटेल-रेस्टाॅरंट्सचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पुढं आली आहे. त्यानुसार 'एफडीए'ने २१ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरदरम्यान एक विशेष मोहीम राबवत वेबसाईट्सला अन्नपदार्थ पुरवणाऱ्या हाॅटोल-रेस्टाॅरंट्सची तपासणी केली.


नोटीस बजावली

या तपासणीत अधिकाऱ्यांनी एकूण ३४७ हाॅटेल-रेस्टाॅरंट्सवर छापे टाकत 'अन्न सुरक्षा मानके कायद्या'चं पालन केलं जातं की नाही हे तपासलं. त्यानुसार ११३ हाॅटेल-रेस्टाॅरंट्सकडे परवानाच नसल्याचं सिद्ध झालं. एवढंच नव्हे, तर अस्वच्छ ठिकाणी जेवण बनवलं जात असल्याचंही समोर आलं. त्यामुळे या ११३ हाॅटेल-रेस्टाॅरंटला नोटीसा बजावत त्यांचा व्यवसाय तिथल्या तिथे बंद करण्यात आल्याचंही आढाव यांनी सांगितलं. या नोटीशीला उत्तर आल्यानंतर ११३ हाॅटेल-रेस्टाॅरंट्सविरोधात कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


कुठल्या बेवसाईट्सचा समावेश?

११३ पैकी ५० हाॅटेल-रेस्टाॅरंट्समधून झोमॅटो, ५० हाॅटेल-रेस्टाॅरंट्समधून स्विगी, ३ हाॅटेल-रेस्टाॅरंट्समधून फूडपांडा, तर २ हाॅटेल-रेस्टाॅरंट्समधून उबर इट वेबसाईट ग्राहकांना अन्नपदार्थ पुरवत असल्याचं पुढे आलं. त्यामुळे या वेबसाईट्सकडूनही 'अन्न सुरक्षा मानके कायद्या'चं उल्लंघन झाल्याचं म्हणत, या वेबसाईट्स ग्राहकांची फसवणूक करत त्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं म्हणत त्यांच्याविरोधातही आता 'एफडीए'ने कारवाईचा बडगा उगारला आहे.


लवकरच खटला

त्यानुसार स्विगी, झोमॅटो, फूडपांडा आणि उबर इट या चारही वेबसाईट्सला नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याविरोधात लवकरच खटला दाखल करण्यात येणार असल्याचंही आढाव यांनी सांगितलं आहे. त्यामुळं ग्राहकांनो, आता आॅनलाईन अन्नपदार्थ मागवण्यापेक्षा घरातच चटपटीत बनवून खा किंवा परवानाधारक आणि स्वच्छ हाॅटेल-रेस्टाॅरंट्सध्येच जाऊन खा, असं सांगण्याची वेळ आली आहे.हेही वाचा-

मुंबईकरांनो सावधान! दुधभेसळखोरांचा सुळसुळाट; दुसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

तुम्ही बनावट कॅडबरी तर खात नाही ना? काळजी घ्या...Read this story in हिंदी or English
संबंधित विषय