आता बॅनर लावाल, तर थेट जेलमध्ये जाल!


SHARE

मुंबईत राजकीय बॅनरबाजी करण्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदी असतानाही सर्वच राजकीय पक्षांकडून शुभेच्छा देणारे बॅनर लावले जात आहेत. मात्र, आजवर महापालिकेच्या वतीने पोलिस स्थानकाला तक्रार पत्र दिल्यानंतरही संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्यात येत नव्हता. पण आता यापुढे अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे. यापुढे तक्रार पत्र नाही तर अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांविरोधात थेट पोलिसांत एफआयआरच दाखल केला जाणार, असा इशारा उपायुक्त (विशेष ) निधी चौधरी यांंनी दिला आहे.


राजकीय बॅनर लावून जाहिरात करण्यास बंदी

मुंबई राजकीय बॅनर तथा फलक लावून जाहिरात करण्यास पूर्णपणे बंदी आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१४ मध्ये मुंबईतील सर्व राजकीय बॅनर महापालिकेने हटवले होते. त्यानंतर मुंबईत काही महिने राजकीय बॅनरबाजी थांबली होती. परंतु त्यांनतर तुरळक प्रमाणात पुन्हा राजकीय बॅनरबाजी सुरू झाली होती. अशा राजकीय बॅनरवर महापालिकेच्यावतीने कारवाई करून त्यांच्याविरोधात एफआयआर करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात पत्र दिले जायचे. पण त्यानंतर अशा प्रकारे मुंबईत बॅनर लावणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करून घेतला जात नसे.


न्यायालयाने महापालिकेला सुनावले

या राजकीय बॅनरबाबत न्यायालयाने महापालिकेला झापले होते. याप्रकरणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेकांकडून न्यायालयाने दंड आकारत तशी समजही दिली होती. परंतु त्यांनंतरही राजकीय बॅनरबाजी जोरात सुरू आहे. त्यामुळे यापुढे शुभेच्छांकरता राजकीय बॅनर अथवा फलक लावल्यास त्यांच्याविरोधात थेट एफआयआर नोंदवण्यासंदर्भात महापालिकेने पोलिसांना सूचना केल्या आहेत.


नाहीतर कारण द्यावे लागेल

मुंबई दिवाळीच्या आधीपासून शुभेच्छा देणारे विविध राजकीय पक्षांकडून बॅनर तसेच फलक लावून मुंबईला विद्रुप केले जात आहे. हे सर्व राजकीय बॅनर महापालिकेच्यावतीने काढून टाकण्यात येत असल्या तरी हे बॅनर लावून एकप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांना एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे. जर ते एफआयआर दाखल करणार नसतील, तर त्यांच्याकडून कारणे लिहून घेतली जाणार आहे. 


'शुभेच्छांचे फलक आणि बॅनर लावू नका'

कायद्याची भीती ही असायलाच हवी. त्यामुळे आजवर अनधिकृत राजकीय बॅनर प्रकरणी एफआयआर होण्यास विलंब होत असला तरी भविष्यात होणार नाही. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना शिक्षा होणार असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाईल, असे उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छांचे फलक आणि बॅनर लावू नका असे आवाहन निधी चौधरी यांनी केली.


हेही वाचा - 

'सवयी बदला मुंबई बदलेल' दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी


संबंधित विषय