Advertisement

२ महिन्यांत साडे तेरा लाखांचे अन्नपदार्थ जप्त; एफडीएची कारवाई

सणासुदीच्या काळात भेसळखोर सक्रीय होऊन अन्नपदार्थ आणि दुधातील भेसळ वाढते. त्यामुळे या कालावधीत एफडीएकडून विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत २० आॅगस्ट ते ३० आॅक्टोबरदरम्यान एफडीएनं २० ठिकाणी धाडी टाकल्या.

२ महिन्यांत साडे तेरा लाखांचे अन्नपदार्थ जप्त; एफडीएची कारवाई
SHARES

दिवाळी अगदी तोंडावर आली असून घरोघरी मिठाई आणि फराळ तयार करण्याची लगबग सुरू झाली असेल. तर अनेकांचा फराळ तयारही झाला असेल. पण मुंबईकरांनो तुम्हाला फराळ करताना, खाताना विशेष काळजी घ्यायची गरज आहे. तुम्ही ज्या अन्नपदार्थांपासून फराळ तयार केला असेल वा करणार असाल तर तो फराळ सुरक्षित असेलच याची काहीच खात्री नाही. कारण मुंबईत अन्न भेसळखोर सक्रीय झाले अाहेत. 


भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रीस

 बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रीस आल्याचं पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून समोर आलं आहे.  गेल्या २ महिन्यांत सणासुदीच्या काळात मुंबईत २० ठिकाणी धाडी टाकत तब्बल साडे तेरा लाख रुपयांचे अन्नपदार्थ जप्त केल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्यानं मुंबईकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


६४७० किलो अन्नपदार्थ नष्ट

सणासुदीच्या काळात भेसळखोर सक्रीय होऊन अन्नपदार्थ आणि दुधातील भेसळ वाढते. त्यामुळे या कालावधीत एफडीएकडून विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत २० आॅगस्ट ते ३० आॅक्टोबरदरम्यान एफडीएनं २० ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीत ६४७०.६ किलोचे अन्नपदार्थ जप्त करत नष्ट करण्यात आले अाहे. या अन्नपदार्थांची एकूण किंमत १३ लाख ५० हजार ७३ रुपये इतकी आहे. यामध्ये दुध, खाद्यतेल, मावा-खवा, मिठाई, तुप, शंकरपाळी, शेव, चिवडा, तांदुळ, पनीर, चकली, फरसाण, बेसन अशा फराळाच्या आणि फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश आहे. 


११६ नमुने जप्त

भेसळयुक्त अन्नपदार्थांचे ११६ नमुने एफडीएनं ताब्यात घेत ते तपासणीसाठी पाठवले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधीत व्यक्ती आणि कंपनीविरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं आढाव यांनी सांगितलं आहे. तर दिवाळीत अन्नभेसळ वाढत असल्यानं ग्राहकांनी परवानाधारक-नोंदणीधारक दुकाने, डेअरीतूनच खवा-मावा, मिठाई, दुध आणि अन्य अन्नपदार्थ खरेदी करावेत, खरेदीचं बिल घ्यावं, पाकिटावरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी, मुदत तपासून घ्यावी असं आवाहन आढाव केलं आहे. तर काहीही संशयास्पद वाटल्यास एफडीएशी संपर्क करावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 



हेही वाचा - 

सणासुदीच्या तोंडावर एलपीजी गॅस महागला

दिवाळीच्या आधीचं बेस्टचं दिवाळं, बेस्टचा कारभार ठप्प होता होता बचावला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा