Advertisement

कोस्टल रोडच्या कामांसाठी ‘एचसीसी’ आणि ‘एल अँड टी’मध्ये स्पर्धा

कोस्टल रोडच्या पॅकेज एकच्या कामासाठी एचसीसी ही कंपनी पात्र ठरली असून पॅकेज दोनमध्ये सोमा कंपनी अपात्र ठरल्याने आता दोन कंपन्यांमध्ये जोरदार चुरस असल्याचं समजतं.

कोस्टल रोडच्या कामांसाठी ‘एचसीसी’ आणि ‘एल अँड टी’मध्ये स्पर्धा
SHARES

मुंबई महापालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी(कोस्टल रोड) निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आता एचसीसी आणि एल अँड टी या दोन कंपन्यांमध्येच स्पर्धा आहे. पॅकेज एकच्या कामासाठी एचसीसी ही कंपनी पात्र ठरली असून पॅकेज दोनमध्ये सोमा कंपनी अपात्र ठरल्याने आता दोन कंपन्यांमध्ये जोरदार चुरस असल्याचं समजतं. त्यामुळे पॅकेज एकमध्ये एचसीसी पात्र ठरल्याने दोनचे काम एल अँड टीला दिल्यास या प्रकल्पांची कामे या दोन्ही नामांकित कंपन्यांकडे जाण्याची शक्यता आहे.


कुठलं काम?

मुंबईच्या नरीमन पॉईँट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांचं काम हाती घेतलं जाणार आहे. हा भराव टाकून रस्ता बांधणं, काही भागांमध्ये पूल तर काहींमध्ये उन्नत मार्ग तर काही भागांमध्ये बोगदे अशाप्रकारे एकूण ३५.६० कि.मी लांबीच्या समुद्र किनारी मुक्त मार्गाचं काम करण्यात येणार आहे. मात्र यामधील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचं काम महापालिकेच्यावतीने केलं जाणार आहे.


कामाचे टप्पे

महापालिकेच्यावतीने पहिल्या टप्प्यात दक्षिण बाजूचं काम हाती घेतले जाणार असून प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज ४), प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज १), बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज २) अशा टप्प्यांमध्ये या कोस्टल रोडचे काम हाती घेण्यात येत आहे.


अंतिम निविदा उघडणार

यामधील पॅकेज एक व दोनसाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आलेली असून या दोन्ही पॅकेजसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. यामध्ये पॅकेज एकसाठी एचसीसी या कंपनीने कमी बोली लावल्याने ती कंपनी या कामासाठी पात्र ठरली आहे. तर पॅकेज दोनची निविदा प्रक्रियेतील अंतिम निविदा उघडण्यात येणार आहे.

परंतु या पॅकेजच्या कामामध्ये हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी (एचसीसी), लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) व सोमा या कंपन्यांनी भाग घेतला होता. परंतु सोमा कंपनी बाद ठरली आहे. त्यामुळे पॅकेज दोनसाठी एचसीसी व एल अँड टी या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्याचे समजते.


नावे लवकरच जाहीर

यासंदर्भात मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांच्याशी संपर्क साधला असता, अद्यापही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व पॅकेट्स खुले केल्यानंतर पात्र कंपनीची नावे जाहीर केली जातील, असं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

'सायकल ट्रॅकसाठी महापालिकांना आर्थिक मदत करा' भाजपाची मागणी

'जकात नाक्याच्या जागी रुग्णालय बांधा'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा