Advertisement

मलेरिया आणि चिकनगुनियाच्या संसर्गात वाढ

नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे मुंबई महापालिकेने आवाहन केले आहे.

मलेरिया आणि चिकनगुनियाच्या संसर्गात वाढ
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेेने (brihanmumbai municipal corporation) मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी मान्सून आरोग्य अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार यावर्षी शहरात कीटकजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्यामध्ये मलेरिया आणि चिकनगुनियाच्या (chikunguniya) रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट 2025 पर्यंत मलेरियाच्या (malaria) रुग्णांची संख्या 5,706 पर्यंत वाढली आहे. तर 2024 मध्ये त्या काळात 4,021 होती. डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही 1,979 वरून 2,319 पर्यंत वाढली. तर चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या 210 वरून 485 पर्यंत दुप्पट झाली आहे.

दरम्यान, शहरातील डॉक्टरांनी असे नमूद केले की सणासुदीच्या काळात मुसळधार पावसानंतर अस्वच्छता पसरल्यामुळे उर्वरित महिन्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण जैसे थे राहणार आहे.

याउलट, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे, गेल्या वर्षी 553 वरून या वर्षी 471 रुग्णांची नोंद झाली आहे. गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या रुग्णांची संख्याही 6,133 वरून 5,774 वर घसरली आहे.

तसेच कोविड-19 च्या रुग्णांची संख्याही 1,775 वरून 1,111 वर घसरली आहे. तथापि, हेपेटायटीसच्या रुग्णांची संख्या 662 वरून 810 वर वाढली आहे.

मुंबई (mumbai) महापालिकेने जारी केलेल्या सूचनांमध्ये नागरिकांना साचलेले पाणी स्वच्छ करण्याचे, मच्छरदाण्यांचा वापर करण्याचे, स्वच्छता राखण्याचे आणि सतत येणाऱ्या तापाकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे.

या प्रसाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने 'शून्य डास निर्मूलन मोहीम' तीव्र केली आहे. यामध्ये 3,284 गृहनिर्माण संस्था, 264 शाळा आणि 545 इमारतींचा समावेश आहे. या मोहिमेचा भाग म्हणून महापालिका सक्रियपणे डासांमुळे होणाऱ्या आजारांसाठी डासांचे संभाव्य प्रजनन स्थळे शोधते आणि ते नष्ट करते.

मान्सून अहवालात असे लिहिले आहे की, "अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे, नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये आणि जवळपासच्या इमारतींमध्ये किंवा आजूबाजूला पाणी साचू नये याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण अशा परिस्थितीत डासांची पैदास होते."

"संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मुसळधार पावसात अनवाणी चालणे टाळण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे," असे मान्सून अहवालात पुढे म्हटले आहे.



हेही वाचा

विक्रोळी: 62 वर्षे जुनी बीएमसी शाळा दुसरीकडे हलवण्यास विरोध

भाडे न भरणाऱ्या 33 बिल्डर्सना SRA बदलणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा