Advertisement

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत हळुहळू वाढ होत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत
SHARES

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत हळुहळू वाढ होत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शिवाय, या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. त्यामुळं कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध भागांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, मंगल कार्ये-सोहळ्यांमध्ये लोकांच्या उपस्थितीची संख्या मर्यादित ठेवणं यांसारख्या उपाययोजना करून तरीही गरज पडल्यास आठवडाभरानं कठोर निर्बंध लागू करण्यावर मंत्रिमंडळात सहमती झाली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या सद्य:स्थितीविषयी सादरीकरण करण्यात आलं. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा अचानक वाढू लागली असून, बुधवारी ४७८७ नवीन कोरोना रुग्ण सापडल्याची व ही संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत एक हजारनं जास्त असल्याची माहिती देण्यात आली. प्रामुख्याने अमरावती विभागात रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून, अचलपूर भागात घरोघरी रुग्ण सापडत असल्याची माहिती देण्यात आली.

कोरोनाविषयक खबरदारीच्या उपायांकडं दुर्लक्ष, शेकडो-हजारोंच्या गर्दीत सुरू झालेले मंगल सोहळे-कार्यक्रम यामुळं परिस्थिती चिघळत असल्याचं अनेक मंत्र्यांनी नमूद केलं. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य व्यवस्थेला आणि प्रशासनाला आपण उपाययोजना राबवण्याचे आदेश देतो, पण दुसरीकडे सर्व काही खुले करतो, लोकांना हवे तसे एकत्र येण्याची मुभा देतो. मग कोरोना नियंत्रणात कसा येणार, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच परिस्थिती अशीच राहिली तर आठवडाभराने राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असंही त्यांनी सूचित केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड व इतर मंत्र्यांनीही बेशिस्त वर्तन व गर्दी गोळा करून होणारे कार्यक्रम याबाबत चिंता व्यक्त केली. तातडीचा उपाय म्हणून विविध प्रकारच्या सोहळ्यांना होणाऱ्या अमर्याद गर्दीला आळा घालून उपस्थितीचे बंधन घालण्याचा आणि मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात नाही आली तर अजून काही कठोर निर्बंध घालण्यावर मंत्रिमंडळात सहमती झाली.



हेही वाचा -

महापौरांचा लोकल प्रवास, हात जोडून केली मास्क घालण्याची विनंती

मुंबईतील चार वॉर्ड पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा