Advertisement

कोरोना संकटकाळात ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार

ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला. तर एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

कोरोना संकटकाळात ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार
SHARES

कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसंच महास्वयंम वेबपोर्टल उपक्रमामार्फत एकूण ५३ हजार ०४१ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (maharashtra government provided jobs to over 53 thousand unemployed youth during lockdown period)

ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला. तर एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केलं आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपलं शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येतं.

ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर ३७ हजार ३२० इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागातून ६ हजार ७१०, नाशिक विभागात ५ हजार ६८७, पुणे विभागात १२ हजार ५२३, औरंगाबाद विभागात ७ हजार ०८८, अमरावती विभागात २ हजार ३४९ तर नागपूर विभागात २ हजार ९६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

हेही वाचा - ..तर एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार १७७, नाशिक विभागात १ हजार ७६४, पुणे विभागात ६ हजार ३२०, औरंगाबाद विभागात २ हजार ९३२, अमरावती विभागात ११० तर नागपूर विभागात ४५१ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

१३ हजार जागांसाठी मुलाखती

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात ७६ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये १२८ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १३ हजार ८९४ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १० हजार ३३२ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार २८९ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

नोंदणी करण्याचं आवाहन

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केलं जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसंच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन मलिक यांनी केलं आहे.

हेही वाचा - 'महाजाॅब्ज' पोर्टलवरील ‘या’ नोंदणीकृत बेरोजगारांना राज्य सरकार देणार प्रशिक्षण


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा