Advertisement

भाजपाला उशीरा जाग, सिनेमागृहातील खाद्यपदार्थांचे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी

मल्टिप्लेक्सविरोधातील आंदोलन होत असताना कुठेही भूमिका न घेणाऱ्या भाजपाला अचानक हा प्रश्न आठवलेला दिसत आहे. त्यानुसारच भाजपाच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी २६ जून २०१८ ला ठरावाची सूचना पाठवून ही मागणी केली आहे. ही सूचना ऑगस्ट २०१८च्या कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आली आहे.

भाजपाला उशीरा जाग, सिनेमागृहातील खाद्यपदार्थांचे दर नियंत्रणात ठेवण्याची मागणी
SHARES

मनसेच्या दणक्यानंतर घाबरलेल्या मल्टिप्लेक्सच्या मालकांनी महागड्या खाद्यपदार्थांचे दर कमी करण्याचं तसंच मिनरल वॉटर बॉटल्सचे दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवाय राज्य सरकारनेही नियम पाळण्याचे आदेश मल्टिप्लेक्स मालकांना दिल्यावर जाग आलेल्या भाजपाच्या गोरेगावमधील नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबईतील सर्व सिनेमागृहांमध्ये विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर नियंत्रणात आणण्यात यावेत, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


सरकारी आदेश

मल्टिप्लेक्समध्ये महागड्या खादयपदार्थाँची विक्री करून रसिकांची मोठी लूट केली जाते. मल्टिप्लेक्स मालक सरकारी आदेशाला जुमानत नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समालकांना जोरदार हिसका दिला होता. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही विधानसभेत घोषणा करत मल्टिप्लेक्स मालकांना सिनेमागृहात महागड्या दरातील खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही. प्रेक्षकांना बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाता येईल, असे निर्देश दिले होते.


सूचना कधी?

हे आंदोलन होत असताना कुठेही भूमिका न घेणाऱ्या भाजपाला अचानक हा प्रश्न आठवलेला दिसत आहे. त्यानुसारच भाजपाच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी २६ जून २०१८ ला ठरावाची सूचना पाठवून ही मागणी केली आहे. ही सूचना ऑगस्ट २०१८च्या कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आली आहे.


मागणी काय?

नाट्यगृहांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरांच्या तुलनेत मॉलमधील सिनेमागृहातील खाद्यपदार्थांचे दर खूपच जास्त आहेत. तसंच प्रेक्षकांना बाहेरुन अल्पोपहाराचे पदार्थ नेण्यासही पूर्णत: बंदी असते. त्यामुळे मुंबईतील सर्व सिनेमागृहांमध्ये विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर नियंत्रणात आणण्यात यावेत, अशी मागणी सातम यांनी केली आहे.



हेही वाचा-

प्रेक्षकांनो, मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ

मल्टिप्लेक्स मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा